बांबवडे : पिशवी जिल्हा परिषद मतदारसंघात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे महिला दिनापासून दोन हजार रुपयांची 'हिरकणी ठेव' योजना राबविणार असल्याची घोषणा जि. प. सदस्य विजय बोरगे यांनी केली. ही योजना ८ मार्च २०२१ पासून राबविली जाणार आहे. महिला सबलीकरणासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती सुरू आहे, पिशवी जिल्हा परिषद मतदारसंघात बराच भाग डोंगराळ व वाड्या-वस्त्यांचा आहे. त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम राबविला जाणार आहे.
मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे हा या योजनेचा हेतू आहे तसेच राज्य व केंद्र शासनाच्या ‘बेटी बचावो, बेटी पढावो’, अभियानाला बळकटी देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न म्हणून हा उपक्रम हाती घेतल्याचे ही विजय बोरगे यांनी सांगितले.