मोहन सातपुते
उचगाव : शिवाजी विद्यापीठ-राजाराम तलाव -सरनोबतवाडी (ता.करवीर ) हा नेहमी वाहनांची वर्दळ असलेला रस्ता सध्या खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कडेला कोल्हापूर शहरातून जीर्ण झालेल्या बांधकामाची माती, वीट, फॅब्रिकेशनचे मोडलेले साहित्य, जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्याबरोबरच येथील कचरा हटविण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे. विद्यापीठ परिसरात राजाराम तलाव काठावर सकाळी-संध्याकाळी फिरायला येणाऱ्या लोकांची संख्याही जास्त आहे. मोकळी व शुद्ध हवा घेणाऱ्या लोकांना रस्त्याच्या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने येथे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
कोट : विद्यापीठ-सरनोबतवाडी रस्त्यावर खड्डे पडले असून, रस्त्याच्या बाजूला अनावश्यक कचरा टाकला जात आहे. यामुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. येथील कचरा उठाव व्हावा, तसेच कचरा टाकणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाही करण्यात यावी. किरण आडसूळ, सामाजिक कार्यकर्ते, सरनोबतवाडी
कोट : या रस्त्यावरील नाक्यापासून स्ट्रीट लाइट नसल्याने अंधार असतो. त्यामुळे चोऱ्या होतात. सामान्य माणूस तक्रार द्यायला पुढे जात नाही. रस्त्याचे काम दर्जेदार झालेले नाही. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा. उत्तम आंबवडे, ग्रा.पं. सदस्य, उजळाईवाडी
फोटो : १३ सरनोबतवाडी रस्ता
सरनोबतवाडी शिवाजी विद्यापीठ रोडवर कचऱ्याचे ढीग.