अतुल आंबी ।सर्वच महाविद्यालयांमध्ये ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट असा विभाग कार्यरत असतो. मात्र, बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंगकडे दुर्लक्ष केले जाते. तो भाग फक्त कागदावरच असतो आणि प्लेसमेंटवर लक्ष केंद्रीत केले जाते. मात्र, ट्रेनिंगवर काळजीपूर्वक लक्ष देऊन काम केल्यास प्लेसमेंट आपोआप मिळते. हे डीकेटीईच्या प्लेसमेंट यशाचे नेमके गमक आहे, अशी माहिती देणारे प्रा. संजय अकिवाटे हे गेली ३३ वर्षे डीकेटीईमध्ये काम करतात. त्यामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंटचा त्यांचा २६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सर्वच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसंदर्भातील माहिती मिळण्यासाठी त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : प्लेसमेंटमध्ये डीकेटीईचे नाव अग्रेसर असण्याचे नेमके रहस्य काय?उत्तर : डीकेटीईमध्ये टेक्स्टाईल विभागातील सर्वच जवळपास ८०० विद्यार्थ्यांना ट्रेनिंगसाठी विविध ठिकाणी पाठविले जाते. त्यामध्ये कोईमतूर ते जम्मू व भुज-गुजरात ते कोलकत्ता अशा सर्वच ठिकाणच्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना माहितीसाठी पाठविले जाते. तसेच इच्छुक असणाºया २५ ते ३० जणांना परदेशातील इंटरनॅशनल कंपन्यांमध्येही ट्रेनिंगसाठी पाठविले जाते. त्याचा सखोल अहवाल त्यांना करावा लागतो. उन्हाळी सुटीत हे करवून घेतले जाते. त्यावर आम्ही स्वत: लक्ष ठेवतो. त्यामुळे प्रत्यक्षात घेतलेल्या अनुभवातून शिक्षण मिळाल्याने प्लेसमेंटसाठी आलेल्या कंपन्या मुलांना तत्काळ निवडतात. नेमके हेच गमक ओळखून डीकेटीईने विद्यार्थ्यांच्या ट्रेनिंगवर लक्ष केंद्रीत केले आहे.
प्रश्न : किती कंपन्यांबरोबर आपला करार आहे?उत्तर : डीकेटीईचा जवळपास ३५० कंपन्यांबरोबर प्लेसमेंटसाठीचा करार आहे. दरवर्षी किमान १५० कंपन्यांबरोबर संपर्क होतो. त्यातील महत्त्वाच्या असलेल्या ६० कंपन्यांना आम्ही बोलवतो. त्यामध्ये त्यांना आवश्यक गुणवत्तेनुसार ते विद्यार्थ्यांची निवड करतात. जगातील टॉप ५ कंपन्याही प्लेसमेंटसाठी येतात. अनेकवेळा ट्रेनिंगसाठी गेलेल्या ठिकाणीही विद्यार्थ्यांची निवड केली जाते. अशा २५ ते ३० जणांना दरवर्षी प्री प्लेसमेंट आॅफरही मिळते.
प्रश्न : वर्षाला किती विद्यार्थ्यांची निवड होते?उत्तर : प्लेसमेंटसाठी जवळपास २२० विद्यार्थी इच्छुक असतात. विशेष म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे सर्वच विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट इंटिग्रेटेड टेक्स्टाईल कंपनी, टेली टॉवेल, शिटींग, टेक्निकल टेक्स्टाईल, डायपर अशी उत्पादने असणाºया कंपन्यांमध्ये निवड होते.विशेष प्रशिक्षणआजकालच्या युगात मुद्देसुद बोलणे, आपले ज्ञान परिपक्वपणे मांडणे, याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. हे ओळखून आम्ही डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास शिबिर (कम्युनिकेशन अॅण्ड सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट) या माध्यमातून विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे प्लेसमेंटसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना डीकेटीईमधील विद्यार्थ्यांची मुलाखत प्रभावी ठरते
विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हे महाविद्यालयांचे कर्तव्यच आहे. मात्र, पुढे त्यांचे जीवन सुखमय व्हावे. त्यांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळावी, यासाठी प्लेसमेंटद्वारे संधी मिळवून देण्यात डीकेटीई नेहमी अग्रेसर असते. - संजय अकिवाटे,