कोल्हापूर : महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील फोटो ,कागदी-कापडी पिशव्या आणि पर्यावरणपूरक खेळणी यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्लास्टिक पिशवीत अडकलेली पृथ्वी पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान मुलांच्या हस्ते मुक्त करून दहाव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. ‘वर्ल्ड मोस्ट फेमस टायगर' या चित्रपटाने महोत्सवाचा पडदा उघडला.शाहू स्मारक भवनात प्राचार्य अजेय दळवी, वीरेंद्र चित्राव, धीरज जाधव, विजय टिपुगडे, अनिल चौगुले, राहुल पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नंदकुमार गुरव यांनी बनवलेल्या ‘प्लास्टिक बंदी आणि वापर’ या विषयाचे सादरीकरण उदय गायकवाड यांनी केले. यात प्लास्टिक बंदीसंबंधीच्या कायद्यातील तरतुदी, मर्यादा आणि आपण करावयाची कृती या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
प्राचार्य अजेय दळवी यांनी महोत्सवासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. वीरेंद्र चित्राव यांनी महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘वर्ल्ड मोस्ट फेमस टायगर' या चित्रपटाने महोत्सवाचा पडदा उघडला. त्यानंतर मिडवे, आइसलॅँड, गॅमो, द क्वीन आॅफ माउंटन्स, द रिटर्न आॅफ संगाई हे लघुपट दाखविण्यात आले.दिवसभरात शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागामध्ये ‘प्लास्टिक बंदी - पर्याय’ या विषयावर झालेल्या गटचर्चेमध्ये १०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रशांत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.यावेळी प्रा. डॉ. पी. डी. राऊत, व्ही. एम. देशपांडे, राहुल पवार, उदय गायकवाड, अनिल चौगुले, आसावरी जाधव, पल्लवी भोसले उपस्थित होत्या.इको-फ्रेंडली सजावटमहोत्सवाच्या निमित्ताने शाहू स्मारक भवनच्या व्यासपीठासह पूर्ण परिसर इको-फ्रेंडली साहित्याने सजवण्यात आला होता. कागदी-कापडी पिशव्या, झाडू, बुट्टी, पत्रावळ्या, द्रोण, खराटा या साहित्याचा वापर करून ही सुरेख सजावट करण्यात आली होती.