लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातून वर्षभरात सुमारे १७३ जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे, त्यापैकी १०७ जणांना शोधण्यात पोलीस यंत्रणेला यश आले. अद्याप सुमारे ६६ जणांचा शोध पोलीस यंत्रणा करीत आहे. अनेकजण रागाच्या भरात घरातून निघून गेले, काही प्रेमप्रकरणाचा आधार घेऊन बेपत्ता झाले, तर काही वयोवृद्ध असल्याने ते बेपत्ता झाल्याच्या नोंदी आहेत.
जिल्ह्यात २०१९ च्या तुलतनेत २०२० मध्ये बेपत्ता झालेल्यांची संख्या १५ ने घटली. २०१९ मध्ये सुमारे १८८ जण बेपत्ता झाले होते. लॉक-अनलॉकमध्ये नागरिकच घरात राहिल्याने बेपत्ताचे प्रमाण कमी झाले. बेपत्ता व्यक्तीची पोलिसांत वारसांनी नोंद केल्यानंतर त्याचे फोटो, वर्णन व माहिती नियंत्रण कक्षामार्फत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांसह जिल्ह्याबाहेरील संबंधित पोलीस ठाण्याकडे पाठविली जाते. त्यातून बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न असतो. काहीवेळा बेवारस सापडलेल्या मृतदेहातूनही बेपत्ता व्यक्तींचा उलगडा झाला. लॉकडाऊन, संचारबंदी बंदोबस्तामुळे यंदाच्या वर्षी बेपत्ता व्यक्तींना शोधण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळच मिळाला नाही.
लॉक-अनलॉकचा बेपत्तावरही परिणाम
कडक लॉकडाऊनच्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांत नागरिकांना संचारबंदीत घरातून बाहेर पडणे प्रतिबंध असतानाही ३५ जण बेपत्ता झाल्याची पोलिसांत नोंद आहे. अनलॉक टप्प्या-टप्प्याने सुरू होत असताना जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत तब्बल ६६ बेपत्तांची नोंद झाली. त्यापैकी ३७ जणांचा शोध लागला आहे. त्यानंतरच्या लॉकडाऊन पूर्ण शिथिल झालेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर कालवधीत ४३ जण बेपत्ताची नोंद आहे.
बेपत्तामध्ये मुलींचे प्रमाण ३२ टक्के
वर्षभरात बेपत्ता झालेल्यांमध्ये मुलींचे प्रमाण हे ३२ टक्क्यांवर राहिले आहे. विशेषत: लॉकडाऊनची स्थिती शिथिल झाल्यानंतर अनेक मुली तसेच अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले. त्या मुली थेट लग्न करूनच फोटो घेऊन पतीसह पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाल्याच्या अनेक घटना घडल्या.
पॉईंटर..
वर्ष - बेपत्ता- सापडले
२०१९ - १८८ - १४६
२०२० - १७३ - १०७