इचलकरंजी : कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी आयजीएम हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या पंधरा दिवसांत हॉस्पिटलमध्ये ३०० बेड कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्या प्रमाणात कर्मचारी मिळतील तसेच दोन ऑक्सिजन प्लांट उभे करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आयजीएम हॉस्पिटलमधील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी शनिवारी सकाळी अकरा वाजता पाहणी केली. यावेळी ते बोलत हाेते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, सध्या कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. मृत्यूच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. हॉस्पिटलला ऑक्सिजनची कमतरता भासत असून, परिसरात दोन ऑक्सिजन प्लांटला मान्यता दिली आहे. तसेच ऑक्सिजनच्या टाक्याही बसविणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू असून, येत्या काही दिवसांत प्रकल्प मार्गी लावला जाईल. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हॉस्पिटलमध्ये कर्मचारी वर्ग कमी असून, त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून, त्या बेचाळीस कर्मचाऱ्यांचा प्रश्नही तातडीने निकालात काढू. रेमडेसिविरचा पुरवठा चार पटीने वाढविला आहे. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, नगरसेवक मदन कारंडे, शशांक बावचकर, सुनील कांबळे उपस्थित होते.
आयजीएममध्ये लहान मुलांसाठी बेड राखीव
कोरोनाची तिसरी लाट येत असल्याने तिचा लहान मुलांवर अधिक परिणाम होत आहे. त्यासाठी पूर्व नियोजन केले जात आहे. आयजीएममध्ये खबरदारी म्हणून दहा बेड राखीव ठेवण्यात येणार आहेत. गरज भासल्यास त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. लसीकरणाचा मुबलक पुरवठा होण्यासाठी ग्लोबल निविदा काढली आहे, असे त्यांनी सांगितले.
इचलकरंजीत मृत्यूदर ४.२ टक्के
केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने कोल्हापूर जिल्ह्यातील आढावा घेतला असून, त्यांनी औषधांसंदर्भात आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. शिवाय उपचार घेण्यात नागरिकांकडून दिरंगाई होत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे आढळून आल्यास अथवा त्रास जाणवत असल्यास तातडीने रुग्णालयात दाखल होण्यासह चाचणी करणे आवश्यक आहे.
(फोटो ओळी) १५ आयजीएम
इचलकरंजीत आयजीएम रुग्णालयास भेट देऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा घेतला. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, मदन कारंडे, आदी उपस्थित होते.