कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्णातील रांगणा किल्ल्याची राज्य शासनाच्या पुरातत्त्व खात्याच्या यादीत नोंद आहे. या किल्ल्याच्या डागडुजीसंदर्भात नियोजन करण्यात आले असून, त्याचे जतन व संवर्धन केले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने यांनी दिली. कोल्हापुरातील पन्हाळगडाची जागतिक वारसास्थळात नोंद करता येईल का, याच्या पाहणीसाठी केंद्र सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या सल्लागार व जागतिक वारसास्थळ समितीच्या सदस्य डॉ. शिखा जैन तसेच भारत सरकारच्या स्मारक प्राधिकरणाच्या सदस्य व राजस्थानच्या इतिहासकार डॉ. रिमा हुजा यांच्यासह महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने, अधिकारी जया गोळवे, सांस्कृतिक विभागाच्या सहायक संचालक अनिता तळेकर, दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे हे मंगळवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शिखा जैन यांच्यासह वहाने यांनी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘रांगणा किल्ला घेतोय अखेरचा श्वास’ या मथळ्याखाली किल्ल्याच्या दुरवस्थेची कहाणी मांडणाऱ्या छायावृत्ताची दखल घेत किल्ल्याचे जतन केले जाईल, अशी ग्वाही दिली. ते म्हणाले, पहिल्या टप्प्यात किल्ल्याची तटबंदी, दगडी बांधकामावरील झाडेझुडपे काढली जातील. त्यानंतर ढासळत चाललेल्या दगडी बांधकामाची पुनर्बांधणी केली जाईल आणि शेवटच्या टप्प्यात मूळ किल्ला कसा होता, याचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे त्याची पुनर्बांधणी करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला रांगणा किल्ला स्वराज्याचा साक्षीदार आहे. त्याकाळी शिवाजी महाराजांनी या गडाच्या डागडुजीसाठी सहा हजार होन खर्च केल्याची नोंद आहे. पावसाळ्यात या किल्ल्यासह परिसराचे दृश्य विलोभनीय असते. ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेले रांगणा किल्ल्याचे छायावृत्त पाहताना सांस्कृतिक मंत्रालयाच्या सल्लागार व जागतिक वारसा स्थळ समितीच्या सदस्या शिखा जैन.
रांगणा किल्ल्याच्या संवर्धनाचे नियोजन
By admin | Published: May 25, 2016 1:09 AM