प्रकाश पाटील - कोपार्डे --यावर्षी हवामान विभागाने चांगल्या मान्सूनचा अंदाज वर्तविला असून, जिल्ह्यात खरीप हंगामातील विविध पिकांखालील क्षेत्रासाठी जिल्हा कृषी विभागाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. खरिपासाठी विविध पिकांखाली तीन लाख ९९ हजार ३० हेक्टरवर नियोजन केले आहे. यात भात, भुईमूग व सोयाबीन पिकासाठी मोठे क्षेत्र आहे.सर्वसाधारण जून ते नोव्हेंबर हा खरिपाचा हंगाम समजला जातो. खरिपामध्ये सिंचन क्षेत्राखाली असणाऱ्या क्षेत्राबरोबर असिंचित क्षेत्राचाही समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने शेतकरी नगदी पीक म्हणून ऊस पिकाला सर्वांत जास्त महत्त्व देतात. यावर्षी पावसाच्या कमतरतेमुळे उसाच्या क्षेत्रात चार हजार ३०० हेक्टरनी घट झाली आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र एक लाख ३७ हजार ३०० हेक्टरवर आले आहे. या खरीप हंगामात भात पिकाखाली एक लाख १० हजार ८०० हेक्टरवर नियोजन आहे. भुईमूग ५२ हजार १०० व सोयाबीन ५३,७०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. खरिपासाठी कृषी विभागाने ३४ हजार ८४३ क्विंटल बियाणांची मागणी केली असून, या हंगामात सोयाबीनचे बियाणे बाजारातून करण्यापेक्षा घरच्याघरी उगवण शक्ती तपासून त्याची पेरणी शेतकऱ्यांनी केल्यास फायद्याचे ठरेल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. सर्वांत जास्त भात पिकाचे बियाणे उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात भात पिकाखालील क्षेत्रात धुळवाफ पेरणी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असते. शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा या तालुक्यांत रोप लावणीवर जोर असतो. यावर्षी मान्सून चांगला होणार आहे. बियाणासाठी शेतकऱ्यांनी स्वावलंबीपणे घरच्याघरी बियाणे उगवण शक्ती परीक्षण करून वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. विशेषत: सोयाबीन, भुईमूग पिकांसाठी बियाणे घरचेच वापरण्याचा सल्ला दिला. -चंद्रकांत सूर्यवंशी जि. प. कृषी अधिकारी
तीन लाख ९९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन
By admin | Published: April 24, 2016 9:52 PM