कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार येत्या १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचे नियोजन गृहीत धरून कामाला लागण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. शिक्षण समितीच्या बैठकीनंतर सभापती प्रवीण यादव यांनी ही माहिती दिली.समितीच्या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. शाळा सुरू करण्याबाबत शासनाकडून अद्याप मार्गदर्शक सूचना नाहीत; पण १ नोव्हेंबरला शाळा सुरू करायच्या असे गृहीत धरून तयारीला लागण्याचे ठरले. पाचवीचा वर्ग जोडण्याबाबतही शासन निर्णयानुसारच कार्यवाही करण्याचे ठरले.
याशिवाय शिक्षकांना आगावू वेतनवाढीचा प्रस्ताव कोरोना संपल्यानंतर शासनाकडे पाठविण्याचेही ठरले. शिंगणापूर क्रीडा प्रशालेतील मॅट खरेदी फसवणुकीसंबंधी ग्राहक न्यायालयात याचिका दाखल करण्याचे ठरले. यात जिल्हा परिषदेची फसवणूक झालेली असल्याने नुकसानभरपाईची मागणी या याचिकेद्वारे केली जाणार आहे.बैठकीला सदस्य भगवान पाटील, वंदना मगदूम, रसिका पाटील, विनय पाटील, स्मिता शेंडुरे, तानाजी पोवार, सतीश बरगे, धोंडिराम पाटील यांनी थेट, तर वंदना जाधव, अनिता चौगुले, प्रियांका पाटील, सुकुमार पाटील यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला.