कोल्हापूर : कोरोना लस घेतल्यानंतर लगेचच काही त्रास जाणवू नये म्हणून वैद्यकीय निरीक्षणाखाली अर्धा तास थांबावे, असा नियमच आहे; पण लसीकरणासाठी गर्दी वाढल्यापासून लस घेणाऱ्या नागरिकापासून ते ती देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांनाच विसर पडल्यासारखी परिस्थिती आहे. लसींची रिॲक्शन लाखातील एखाद्यालाच होत असलीतरी तातडीने केंद्राबाहेर पडणे, उन्हात भटकणे आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकते.
काेराना विषाणूशी लढण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढीस लागावी या हेतूने लसींची निर्मिती केली आहे. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन या लसींचे डोस प्राधान्याने जिल्ह्यात दिले जात आहेत. लस घेतल्यानंतर १० ते १२ तासांनी ती शरीरभर पसरते. या लसीचा काहींना सौम्य, तर काहींना अतितीव्र स्वरूपाचा त्रास होतो; पण तोदेखील त्रास २४ तासांचाच असतो.
केंद्रावर लस घेतल्यानंतर लगेचच काही त्रास जाणवू नये म्हणून वैद्यकीय निरीक्षणाखाली अर्धा तास थांबावे, असा लसीकरणाचा नियम आहे; पण लसीकरणासाठीच्या वाढत्या गर्दीमुळे हा नियमच पायदळी तुडवला जात आहे. लस टोचल्यापासून ५ ते १० मिनिटांतच बाहेर जाण्यास सांगितले जाते. जाताना पॅरासिटिमॉलच्या चार गोळ्या दिल्या जातात.
१) पॉइंटर्स
आतापर्यंत झालेले लसीकरण
एकूण लसीकरण - १२ लाख २७ हजार ६१७
पहिला डोस - ९ लाख ७६ हजार ३७७
दुसरा डोस - २ लाख ५१ हजार २४०
एकूण लसीकरण केंद्रे - ३५०
३० ते ४४ वयोगटासाठी अजून केंद्र निश्चिती नाही
या वयोगटासाठीचे लसीकरण अत्यल्प प्रमाणात आाणि आहे त्या केंद्रांवरच सुरू आहे. या वयोगटाची लोकसंख्या १८ लाख इतकी सर्वाधिक आहे. त्यासाठी आणखी २०० केंद्रांची आवश्यकता आहे; पण सध्या लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांनाच प्राधान्याने लस दिली जात असल्याने आणि पुरवठाही आठवड्यातून दोन वेळा १५ हजारांचा होत असल्याने सद्य:स्थितीत ३० ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण बऱ्यापैकी थांबविण्यात आले आहे.
२) लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?
लसीकरणाची फारशी रिॲक्शन येत नाही; पण आलीच तर तिचे प्रमाण लाखात एक असते आणि ही रिॲक्शन जीवघेणी ठरू शकते. चक्कर येणे, मेंदूचा रक्तपुरवठा थांबणे, अशा घटना घडू शकतात. त्यामुळे अर्धातास केंद्रातच थांबल्यास व काही अडचण आली तर तातडीने उपचार करणे शक्य होते. न थांबता तसेच बाहेर पडले आणि बाहेर जाऊन काही अडचण आली, तर नेमके कशामुळे आणि काय झाले, हे सांगण्याच्या मन:स्थितीत तो रुग्ण असेलच, असे नाही. त्यामुळे लोकांनी काळजी म्हणून अर्धातास केंद्रातच थांबावे, असे आवाहन लसीकरण अधिकारी डॉ. एफ.ए. देसाई यांनी सांगितले.
३) लस हेच औषध
लसीकरणानंतर त्रास झाल्याच्या काही तक्रारी असल्या तरी कोरोनावर लस हेच औषध आहे. त्यामुळे थोडासा त्रास झाला तरी लसीकरण केंद्रावरील डाॅक्टरांकडून दिलेली औषधे व पुरेशी विश्रांती घेऊन या त्रासावर मात करता येते.
४) दोन कॉलम फोटो (लसीकरण केंद्रावरील फोटो नसीर अत्तार देणार आहेत.)