तानाजी पोवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चैनीसाठी पैसा तर हवाच, तोही झटपट, मग तो मार्ग कोणताही असो, पैसा मिळत असेल तर ही तरुणाई वाट्टेल ते करण्यासाठी तयार आहे. तरुणाईच्या हातात देशाचे भवितव्य आहे. पण तीच तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. सध्या कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगणाऱ्यांपैकी ५० टक्के ही तरुणाई असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
कळंबा कारागृहात महाराष्ट्रासह राज्याबाहेरीलही कैद्यांची संख्या मोठी आहे. कारागृहात एकूण २४५० कैदी आहेत. झटपट पैसे कमावण्याच्या मोहजालात तरुणाई भरकटली आहे, गुन्हेगारीचा मार्ग पत्करल्याने त्यांचे जीवनमान उद्ध्वस्त होत आहे. कळंबा मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यांच्या माध्यमातून १८ ते ३० या वयोगटातील सुमारे ९८० कैदी गजाआडचे जीवन जगत आहेत. ३१ ते ५० वयोगटातील ८२९ कैदी, तर ५१ वर्षावरील सुमारे १४९ कैदी कारागृहालाच घर मानून जीवन जगत आहेत.
महिला कैदी ४१
कळंबा कारागृहात सुमारे ४१ महिला कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यामध्ये काही कच्च्या कैद्यांचाही समावेश आहे. त्यांच्यासाठी कारागृहातच स्वतंत्र बराक निर्माण केलेले आहे.
पैशासाठी वाट्टेल ते...
मृगजळात अडकलेली तरुणाई पैशासाठी वाट्टेल ते करण्यास तयार आहे. खंडणीसाठी अपहरण, जमीन व्यवहार, पैशाची देव-घेव, चोरी, तस्करी आदी व्यवहारातून झटपट पैशाची कमाई होत असल्याने तरुणाई गुन्हेगारी विश्वात अडकली. अखेरचा मार्ग हा कारागृहाच्या भिंतीपलीकडे जात असल्याचे माहीत असूनही ही तरुणाई मोहजाळात अडकली आहे.
पॅरोलवर ४५० कैदी बाहेर
कोरोना काळात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कळंबा कारागृहातील सुमारे ४५० हून अधिक कैदी आज पॅरोल व रजेच्या निमित्ताने कारागृहाबाहेर आहेत. पॅरोलची ४५ दिवसांची संपलेली मुदत पुन्हा वाढवून त्यांचा मुक्त संचार सुरु आहे.
पाईंटर..
- वय १८ ते ३० : ९८० कैदी
- वय ३१ ते ५० : ८२९ कैदी
- वय ५१ च्या पुढे : १५० कैदी
फोटो नं. २२१२२०२०-कोल-कळंबा जेल