कोल्हापूर : आधीच वयोमानानुसार आलेल्या अंधूक दृष्टीवर शस्त्रक्रियेचा उतारा शोधायचा तर कोरोनाची साथ आडवी आली आणि डोळ्यांच्या शस्त्रक्रियाच ठप्प झाल्या. एप्रिलपासून शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद केल्याने जिल्ह्यातील अडीच हजारांवर गाेरगरीब ज्येष्ठांसमोर अंधार पसरला आहे. कोरोना कधी संपणार, शस्त्रक्रिया कधी सुरू होणार हे कुणालाच माहीत नसल्याने प्रकाशाची आस लावून अंधारात चाचपडण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.
सरकारी दवाखान्यात ज्येष्ठांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत होतात. सीपीआरमध्ये त्यासाठी डॉ. अभिजीत ढवळे यांच्या नेतृत्वाखाली नेत्र विभाग कार्यरत आहेत. दरवर्षी सरासरी अडीच हजारावर नेत्र शस्त्रक्रिया येथे होतात, पण गेल्या वर्षी कोरोना आला आणि सर्व थांबले. डिसेंबरमध्ये कोरोनाचे थैमान कमी झाल्यानंतर शस्त्रक्रियांना सुरुवात झाली. एप्रिलच्या मध्यापर्यंत चार महिन्याच्या या कालावधीत ९११ शस्त्रक्रिया झाल्या. अजूनही प्रतीक्षा यादी जास्त असल्याने शस्त्रक्रियांचे नियोजन सुरू असताना कोरोनाचा कहर वाढू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रानंतर १७ एप्रिलपासून शस्त्रक्रिया पूर्णपणे थांबवण्यात आल्या. सीअीपार हे पूर्ण क्षमतेने कोवीड रुग्णालय झाल्याने ओपीडी कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात हलवण्यात आली.
चौकट ०१
डोळे नशिबाच्या हवाली
खासगी दवाखान्यात मोतीबिंदूचे ऑपरेशन करायचे म्हटले तर किमान ८ हजार ते २० हजारापर्यंतचा खर्च येतो. ज्येष्ठ नागरिकांना खासगी दवाखान्यात जाणे परवडत नसल्याने मोफत उपचार करणारे सीपीआर हाच त्यांचा एकमेव आधार होता. पण ती दारेच कोरोनाने बंद केल्याने ज्येष्ठांनी आपले डोळे नशिबाच्या हवाली सोडल्याची परिस्थिती आहे.
शासकीय रुग्णालयात कोरोनाआधी महिन्याला होणाऱ्या नेत्र शस्त्रक्रिया - २५००
गेल्या वर्षभरात झालेल्या नेत्र शस्त्रक्रिया - ९११
कोट
कोरोनामुळे शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्याने प्रतीक्षा यादीतील आकडा वाढत जाणार आहे. कोरोना निवळल्यानंतर त्याचा सर्वात मोठा ताण आरोग्य यंत्रणेवर येणार आहे. शिवाय मोतीबिंदू झाल्यावर लगेच शस्त्रक्रिया न झाल्यास काचबिंदूचा धोका वाढतो. ज्येष्ठ नागरिकांचे वयाेमान व प्रतिकारशक्ती पाहता त्यांना कायमचे अंधत्व येण्याचा धोका असतो. त्यामुळे तातडीचे असल्यास खासगी दवाखान्याचा पर्याय स्वीकारावा.
डॉ. अभिजीत ढवळे,
नेत्र विभाग प्रमुख, सीपीआर, कोल्हापूर
अंधार कधी दूर होणार?
नेत्र शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्यांच्या प्रतिक्रिया
मला डोळ्यांचा त्रास जाणवत असल्याने डॉक्टरांना दाखवले होते. मोतीबिंदू झाल्याने ऑपरेशन करूया असे सहा महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी सांगितले होते, पण आजपर्यंत झालेले नाही, आता काेरोना असल्याचे सांगितले जात असल्याने मी आता काय करायचे तुम्हीच सांगा.
आक्काताई पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
डोळ्यांनी अंधूक दिसत होते म्हणून डॉक्टरांनी मोतीबिदूंचे ऑपरेशन करूया असे सांगितले होते. आता माझी दृष्टी खूपच नाजूक झाली आहे. लवकर ऑपरेशन झाले नाही तर अंध म्हणून जीव सोडावा लागणार असे दिसत आहे. शरीर साथ देत नाही, निदान डोळे असल्यामुळे स्वत:चे करता येत होते, आता तेही होत नसल्याने धीर सुटत चालला आहे.
पांडुरंग येसादे
शिरोळ