कोल्हापूर : वर्ग भरवा पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांबाबतची आवश्यक ती दक्षता घ्या, अशी भावना कोल्हापुरातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आहे. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि संबंधित शाळांनी बहुतांश तयारी पूर्ण केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग दि. २३ नोव्हेंबर २०२० पासून सुरू झाले. या वर्गांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती टप्प्याटप्य्याने वाढली आहे. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने सहमती दर्शविली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार या इयत्तांचे वर्ग दि. २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांना सूचना दिल्या आहेत. यानुसार वर्गांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर, हात धुण्याची व्यवस्था, सकाळी आठ ते अकरा, सकाळी अकरा ते दोन या सत्रांमध्ये वर्ग भरविणे, आदी स्वरूपातील तयारी बहुतांश शाळांनी पूर्ण केली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवून देण्याबाबतची संमत्तिपत्रे दिली आहेत. दरम्यान, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी काही शाळांनी पाचवी, आठवीचे वर्ग दोन सत्रांमध्ये गेल्या महिन्यापासून सुरू केले आहेत.
चौकट
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती
जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या एकूण १०५४ शाळा आणि तेथील विद्यार्थी संख्या २,२४,४४३ इतकी आहे. सध्या ९७५ शाळांमधील वर्ग सुरू आहेत. त्यामधील उपस्थित विद्यार्थी संख्या १४४९१९ इतकी आहे.
प्रतिक्रिया
शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत आम्ही दक्ष आहोत. हे वर्ग सुरू करण्याबाबतच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील तयारीसाठी मुख्याध्यापकांच्या वेबिनारव्दारे बैठका घेतल्या आहेत. वर्ग सुरू करण्याची अधिकत्तर शाळांची तयारी पूर्ण झाली आहे.
-किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी
प्रतिक्रिया
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता वर्ग सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. वर्ग भरविताना मात्र, सॅनिटायझर, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, आदींचे पालन शाळांमध्ये काटेकोरपणे व्हावे.
-अनुपमा मुळे, पालक, माळी कॉलनी
प्रतिक्रिया
ऑनलाइन शिक्षणावर मर्यादा आहेत. त्यामुळे वर्ग सुरू होणे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन योग्य पद्धतीने व्हावे, यादृष्टीने शाळांना व्यवस्था करावी.
-संजय म्हाकवे, पालक, गोकुळ शिरगाव
प्रतिक्रिया
इयत्ता नववी, दहावीतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत पाचवी, सहावीचे विद्यार्थी लहान असतात. त्यामुळे त्यांच्या मास्कचा वापर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन कितीपत होईल याची शंका वाटते. शाळांनी आवश्यक काळजी घ्यावी.
-तेजस्विनी कटके, पालक, राजेंद्रनगर
जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
पाचवीत शिक्षण घेणारे विद्यार्थी : ५७८४१
सहावीत शिक्षण घेणारे विद्यार्थी : ५७३९५
सातवीत शिक्षण घेणारे विद्यार्थी : ५८३२०
आठवीत शिक्षण घेणारे विद्यार्थी : ५८८००
शाळांची संख्या : १०५४
शिक्षकांची संख्या : १२६२९
फोटो (१८०१२०२१-कोल-शाळा सुरू तयारी) : सोनाळी (ता. करवीर) येथील श्री. धाकेश्वर हायस्कूलची इमारत, वर्गांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.