सन २०१९-२० वर्षामध्ये १६ विद्यार्थ्यांचा, तर २०२०-२१ मध्ये २१ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूची कारणे सर्पदंश, विजेचा धक्का लागून आणि पाण्यात बुडून, आदी आहेत. मृत्यू झालेल्या ३७ विद्यार्थ्यांपैकी सन २०१९-२० मधील १६ विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाकडून अनुदान वाटप झाले आहे. प्रत्येक कुटुंबाला ७५ हजार रुपये अनुदान देण्यात आले. गेल्या वर्षीचे १७ प्रस्ताव मंजूर असून त्यासाठीच्या अनुदानाची प्राथमिक शिक्षण विभागाने शासनाकडे मागणी केली आहे. उर्वरित चार प्रस्ताव हे २० ऑक्टोबर २०२० नंतर प्राप्त झाले असून, त्याबाबतची कार्यवाही शिक्षण विभागाकडून सुरू आहे.
प्रतिक्रिया
गेल्या वर्षीच्या अनुदानाची रक्कम शासनाकडून प्राप्त होताच त्याचे तत्काळ वितरण केले जाईल. सध्या एकही प्रस्ताव प्रलंबित नाही.
-आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
चौकट
मुलांची जिवापाड काळजी घ्या
आम्हाला अनुदान मिळाले. मात्र, लाखमोलाचे बाळ आम्ही गमावले. त्याला विसरणे शक्य नाही. त्याचा चेहरा डोळ्यांसमोरून जात नाही. प्रत्येक पालकांना माझी कळकळीची विनंती आहे की, आपल्या मुलांची काळजी घ्या. त्यांना जिवापाड जपा, असे सांगताना आवळी (ता. पन्हाळा) येथील पालक संदीप कदम यांना अश्रू अनावर झाले.
मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
पाण्यात बुडून : १८
वाहन अपघात : ७
विजेचा धक्का लागून : ४
अन्य अपघात : ४
सर्पदंश : ३
भाजून : १
चौकट
पन्हाळा, चंदगडमधील अधिक प्रस्ताव
दोन गेल्या वर्षांत दाखल झालेल्या प्रस्तावांमध्ये सर्वाधिक सहा प्रस्ताव पन्हाळा तालुक्यातील, तर चंदगड, करवीरमधील प्रत्येकी पाच आहेत. त्यापाठोपाठ भुदरगड, हातकणंगले, गडहिंग्लज, कागल, आजरा, कोल्हापूर शहर, शिरोळ यांचा क्रम आहे.