समीर देशपांडे ।कोल्हापूर : नागरी भागातील झपाट्याने कमी होणारी वृक्षसंख्या रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. त्यातूनच सासरी जाणाºया लेकीची आठवण म्हणून माहेरी वृक्ष लागवड करण्यापासून ते घरामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर त्या आनंदाप्रीत्यर्थ झाड लावण्यापर्यंतच्या अनेक योजनांचा समावेश केला आहे.
राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये वृक्षलागवड ज्या पद्धतीने प्रभावीपणे करण्यात येते त्याच धर्तीवर नागरी भागातही हा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय नगर विकास विभागाने घेतला आहे. महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रामध्ये अशा पद्धतीने वृक्षलागवडीवर भर देण्यात येणार आहे.
एखाद्या घरात बाळ जन्माला आल्यानंतर या स्थानिक स्वराजय संस्थेने त्यांच्या घरी जाऊन झाड देऊन त्यांचे अभिनंदन करावे आणि बाळाप्रमाणेच हे झाड वाढविण्याचे आवाहन करावे. दहावी-बारावी किंवा अन्य महत्त्वाच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, नोकरी लागल्यानंतर, विविध निवडणुकांमध्ये विजयी झाल्यानंतर त्यांना रोपे देऊन त्यांचे अभिनंदन करावे व ते लावण्यासाठी विनंती करावी, अशा सूचना नगर विकास विभागाने दिल्या आहेत. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतरही त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ झाड लावले जावे. अशा पद्धतीने जन्म वृक्ष, आनंद वृक्ष, स्मृती वृक्ष लावण्याबाबत सूचना दिल्या आहेत.शुभमंगल वृक्ष अन् माहेरची साडीया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील विवाहप्रसंगी वधू-वरांना शुभाशीर्वाद म्हणून वृक्ष व फळझाडांची भेट द्यावी तसेच सासरी जाणाºया मुलींच्या माहेरच्या मंडळींना झाडांची भेट देऊन त्यांनी लेकीचा जसा सांभाळ केला तसेच हे झाड लावून ते मायेने वाढवावे, अशी विनंती त्यांना करावी अशी ही योजना आहे.१ जुलैला रोपांचे वाटपविवाह झालेल्या, निधन पावलेल्या आणि विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण अशांची यादी काढून त्यांना एकाच दिवशी १ जुलैला रोपांचे वाटप करणार असून त्यांना ट्री गार्ड, लागवडीचा आढावाबाबतही सविस्तर सूचना दिल्या आहेत.