कोल्हापूर : महानगरपालिका आणि विविध सेवाभावी-स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रविवारी राबविलेल्या रस्ते, चौक, उद्याने स्वच्छ करण्याच्या मोहिमेत सुमारे दोन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. तसेच स्वच्छता केलेल्या परिसरात औषध तसेच धूर फवारणीही करण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्वत: हातात झाडू घेऊन या परिसरातील स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.महानगरपालिका, स्वरा फौंडेशन आणि केआयटी कॉलेजतर्फे मध्यवर्ती बसस्थानक परिसर, दाभोळकर कॉर्नर परिसरात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत हवा प्रदूषण रोखण्यासाठी विषारी वायू शोषून घेणारी झाडेही प्रशासक बलकवडे यांच्या हस्ते लावण्यात आली. तसेच वाहन चालविणाऱ्या नागरिकांना गुलाबफूल देऊन हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.रविवारी ८३ व्या स्वच्छता मोहिमेतून मध्यवर्ती बसस्थानक परिसरासह शहरातील प्रमुख चौक, रस्ते, गटारी, नाले, फूटपाथ, घाट तसेच उद्यानांमधील कचरा, प्लास्टिक, झाडांच्या फांद्या कट करणे, वृक्षलागवड, वॉल पेंटिंग तसेच स्वच्छता झाल्यानंतर त्या ठिकाणी औषध फवारणी करून परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यात आला. शहरात स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत दुर्मीळ तसेच औषधी वृक्षलागवड करून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देऊन नागरिकांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगण्यात आले.तसेच टाकाळा चौक ते उड्डाणपूल, तलवार चौक ते साने गुरुजी वसाहत बसस्टॉपपर्यंत, आयसोलेशन हॉस्पिटल मेन रोड, हॉकी स्टेडियम ते गोखले कॉलेज, पंचगंगा नदीघाट परिसर, तसेच जयंती नदी मैला-सांडपाणी पंपिंग स्टेशन, रेणुका मंदिर ते हॉकी स्टेडियम चौक रोडवरील कचरा व प्लास्टिक गोळा करण्याबरोबरच खुरटी झाडे, झुडपे आणि कचरा काढून हा परिसर स्वच्छ करण्यात आला.