इंदुमती गणेश ।कोल्हापूर : कोल्हापूरसह मराठी चित्रपटसृष्टीसाठी आशेचा किरण असलेल्या कोल्हापूर चित्रनगरीचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी झाडांच्या लागवडीसाठी पुन्हा नव्याने ‘श्रीगणेशा’ करावा लागणार आहे. पूर्वी दिलेल्या टेंडरचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने आता पुन्हा नव्याने टेंडर काढावे लागणार आहेत. त्यातच आता पावसाळाही संपल्याने हा प्रकार म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असाच होणार आहे. येत्या २४ तारखेला होणाºया बैठकीत चित्रनगरीतील शूटिंगचे उद्घाटन, झाडांचे टेंडर, चित्रीकरणासाठीचे दर काय असावेत यासंबंधी निर्णय घेतले जाणार आहेत.कोल्हापूरला लाभलेली चित्रपट परंपरा आणि कोल्हापूरकरांच्या पाठपुराव्याला यश येऊन मोरेवाडी येथील माळावर चित्रनगरीच्या इमारतींचा कायापालट होत आहे. शासनाने पहिल्या टप्प्यासाठी दिलेल्या १२ कोटींच्या निधीतून मुख्य स्टुडिओत बंगला, दवाखाना, न्यायालय, महाविद्यालय अशी जवळपास ३० लोकेशन्स साकारली आहेत. शेजारीच पाटलाचा वाडा, आवारातील रस्ते, कंपौंड वॉल, असे देखणे रूप आकाराला येत आहे.
या इमारतींची अंतर्गत कामे आणि रंगकाम सध्या सुरू आहे. एकीकडे लोकेशन्सची कामे अंतिम टप्प्यात आली असताना परिसरातील माळ मात्र अजूनही उजाड अवस्थेतच आहे. या माळावर पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दोन हजार वृक्ष लावण्यात येणार होते. मात्र, अद्याप शासनाकडून या टेंडरला मंजुरी मिळालेली नसल्याने वृक्ष लागवड झालीच नाही. दरम्यान, चित्रनगरीच्या जून महिन्यातील उद्घाटनाचा मुहूर्तही लांबणीवर पडला.परिसरात खास चित्रीकरणासाठी उपयुक्त असतील अशी १५ फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण झाडे लावण्यात येणार आहेत. ही हैदराबाद येथून मागवून त्यांची लागवड क्रेनच्या सहाय्याने करण्यात येणार होती.
हे टेंडर ज्या कंपनीला दिले जाईल त्यांनीच पुढील तीन वर्षे झाडे जगवायची आहेत. त्यानंतर ती चित्रनगरीला हस्तांतरित करायची आहेत. त्यातील एक झाड जरी जगले नाही तर दंडाची तरतूद केली होती. त्यासाठी काही ठेकेदारांनी निविदाही भरल्या. मात्र, त्यावर शासनाने निर्णय घेऊन अंतिम मंजुरीच न दिल्याने हे काम रेंगाळले. पावसाळ््यातच झाडांची मुळे जमिनीत रुजतात. आता पावसाळा संपला आणि त्यावेळी निविदा भरणाºया ठेकेदारांनी आता त्याच रकमेला पुन्हा निविदा भरण्यास असमर्थता दर्शवली आहे. या झाडांच्या लागवडीसाठी नव्याने टेंडर प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यातील काही तरतुदींमध्ये बदल करून काही दिवसांत निविदा जाहीर करण्यात येणार आहे.
रस्त्यावरची वीज, अंतर्गत लाईट व्यवस्था अशी काही कामे वगळता चित्रनगरीचे पहिल्या टप्प्यातील काम आता पूर्ण होत आले आहे. झाडांच्या लागवडीसाठी पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया करण्यात येणार आहे. कलाकारांच्या सूचनेनुसार काही बदल करण्यात आले आहेत. २४ तारखेला होणाºया बैठकीत चित्रनगरीसंबंधीचे निर्णय घेतले जातील.- इंद्रजित नागेशकर (आर्किटेक्ट)