सावरवाडी : करवीर तालुक्यातील सातेरी महादेव डोंगरावरील धोंडेवाडी गट क्रमांक ३७५ वरील ६२ एकर जमिनीवर वृक्ष लागवडीकरिता पाच वर्षांसाठी एकूण ६८ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली. या निधीतून या परिसरात ३८ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सातेरी- महादेव डोंगर वृक्षांअभावी ओसाड असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या बातमीची दखल घेऊन हे वृक्षारोपण होणार आहे.सामाजिक वनीकरणातून हरित टेकडी योजनेतून ही वृक्ष लागवड होणार असल्याने सातेरी-महादेव डोंगरी भाग वनराईने नटणार आहे. महादेव सातेरी प्राचीन मंदिर परिसर पर्यटकांना भुरळ घालते. गेल्या चार दशकापासून या परिसरात वृक्षाविना ओसाड जमीन पडलेली आहे. पर्यटकांना विसाव्यासाठी झाडांची उणीव भासते आदी असे सांगून सूर्यवंशी म्हणाले, डोंगरमाथ्यावर झाडे नसल्यामुळे जमिनीची धूप प्रचंड स्वरूपात होऊ लागली आहे. येथे वृक्षारोपण करण्याची गरज असल्याने सामाजिक वनीकरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून सुमारे ६८ लाख रुपयांची हरित टेकडी योजना मंजूर करून घेतली आहे. पहिल्या तीन वर्षांसाठी खड्डे खणणे, वृक्ष लागवड करणे, संवर्धन करणे, औषधे, खते, पाण्याचे वाटप याकरिता ३८ लाख ९० हजार १८१ रुपये खर्च केले जाणार आहेत. पुढील दोन वर्षांत उर्वरित रक्कम खर्च केली जाईल. राजेंद्र सूर्यवंशी यांनी शेषफंडातून महादेव मंदिराजवळील हॉल शेजारी कूपनलिका मंजूर केली आहे. (वार्ताहर)‘सातेरी-महादेव डोंगर वृक्षाअभावी ओसाड’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने दि. २० जूनच्या अंकात बातमी प्रसिद्ध केली होती. त्या वृत्ताची दखल घेऊन करवीर पंचायत समितीचे सदस्य व उद्योगपती राजेंद्र सूर्यवंशी यांनी त्वरित वृक्ष लागवडीस मंजुरी घेतली. त्यामुळे जनतेतून ‘लोकमत’चे अभिनंदन होत आहे.
सातेरी-महादेव डोंगरावर वृक्षारोपण करणार
By admin | Published: June 26, 2015 10:06 PM