कोल्हापूर : ‘आम्ही कोल्हापुरी, झाडे घरोघरी’असा नारा देत शहरात दि. १२ जूनला एकाच दिवशी आठ हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत. महानगरपालिका प्रशासन लोकसहभागातून हा उपक्रम राबविणार असल्याने वृक्ष मागणीकरिता नावनोंदणी करणाऱ्यांनाच विविध जातीचे वृक्ष देण्यात येणार आहेत. एकदा वृक्ष लावल्यानंतर त्याचे संगोपन, जतन करण्याची जबाबदारी या उपक्रमात सहभागी होणाऱ्या संबंधित व्यक्तींची असेल. कोल्हापूर शहराच्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यामध्ये शहरातील सूज्ञ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन मंगळवारी महापौर अश्विनी रामाणे, आयुक्त पी. शिवशंकर तसेच आमदार सतेज पाटील यांनी केले आहे. यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली ताराबाई गार्डनमधील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला आयुक्त शिवशंकर, आमदार सतेज पाटील, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक ता. पा. पाटील, सहायक संचालक सुहास साळोखे, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते प्राचार्य मधुकर बाचुळकर, प्रा. एस. आर. यादव, उदय गायकवाड, अनिल चौगुले, महापालिकेचे उद्यान अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना आ. सतेज पाटील यांनी सांगितले की, ‘कोल्हापूर संवाद’ कार्यक्रमातून शहरातील नागरिकांना वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी कॉँग्रेसच्या अजेंड्यातसुद्धा आम्ही तसा शब्द शहरवासीयांना दिला होता म्हणून ‘आम्ही कोल्हापुरी-झाडे घरोघरी’ असा नारा देत हा उपक्रम राबविणार आहोत. महानगरपालिका सर्वांना मोफत झाडे देईल; परंतु त्यासाठी ५ मेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. एका व्यक्तीला जास्तीत जास्त तीन वृक्ष दिले जातील.वृक्षारोपण तसेच संवर्धन करण्यासाठी मनपाने चौदाव्या वित्त आयोगातून मिळालेल्या तीस लाख रुपयांच्या निधीतून आठ ते दहा हजार वृक्ष खरेदी केले जाणार आहेत. त्यासाठी निविदा काढून संबंधित नर्सरीचालकांकडून ती घेण्यात येतील, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. ज्यांना वृक्ष देण्यात आले, त्यांनी ती जगविले की नाही याचा आढावा पुढील वर्षी मनपा प्रशासनाकडून घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. ही लोकचळवळ असल्याने त्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी) जे नावनोंदणी करतील त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे करंज, कडुलिंब, बहावा, श्रीश, सिसव, मोह, शिवण, आवळा, सीता अशोक, बकुळ, जांभुळ, करंबळ, जारूल, काशीद, टेंभुर्णे, कवठ, आपटा, सातवीन या जातीचे वृक्ष देण्यात येणार आहेत. हे वृक्ष तीन वर्षे वयाची असतील, त्यामुळे संवर्धनासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार नाही.
मनपा लोकसहभागातून झाडे लावणार
By admin | Published: April 27, 2016 12:02 AM