पाचगाव : पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू उत्पादनावर व वापरावर शासनाने बंदी घातली; परंतु कोल्हापूर शहरासह उपनगरामध्ये अद्यापही प्लास्टिकचा वाढता वापर होत असल्याचे चित्र आहे. शासनाने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या प्लास्टिक बंदीला हरताळ फासला जात आहे.
कायदा झाल्यांनतर सुरुवातीला प्रशासनाने प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकानांवर धाडी टाकून दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर नव्याचे नऊ दिवस झाल्यावर प्रशासनाने दुर्लक्ष व कारवाईला स्थगिती दिल्याने प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. बाजारपेठेतील छोटे-मोठे व्यापारी, भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते, हातगाडीवाले बिनधास्तपणे ग्राहकांना प्लास्टिकच्या पिशवीमधून साहित्य देत आहेत. या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर वाढल्याने सर्वत्र प्लास्टिकचा कचरा पुन्हा एकदा डोके वर काढू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
.........
प्राण्यांचे जीवन धोक्यात
इतरत्र फेकलेल्या प्लास्टिक पिशव्या प्राणी खातात. प्लास्टिकमधील वस्तू नष्ट होतील; पण प्लास्टिक नष्ट होत नाही. त्यामुळे हेच प्लास्टिक प्राण्यांच्या पोटात अडकून राहते. त्यामुळे प्राण्यांचे जीवन धोक्यात येते. पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये शासनाने ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर (वापर आणि विक्री) बंदी घातली आहे. हे माहिती असूनही त्यापेक्षा कमी जाडीच्या पातळ प्लास्टिकच्या पिशव्यांची निर्मिती व विक्री धडाक्यात सुरू आहे.