कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी घालण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी भाविकांना कापडी पिशव्यांमधून पूजेचे साहित्य द्यावे, मार्किंगच्या आत राहून व्यवसाय करा, भेसळयुक्त पदार्थ ठेवू नका, भाविकांशी सौजन्याने वागा, त्यांना गरजेच्या वेळी सर्वतोपरी सहकार्य करा, अशा विविध सूचना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सोमवारी मंदिर परिसरातील व्यापारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.नवरात्रोत्सवाला दोन दिवस राहिल्याने अंबाबाई मंदिर आवारातील तयारीचा अंतिम टप्प्यातील आढावा घेतला जात आहे. याअंतर्गत सोमवारी दुपारी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी मंदिर आवारातील व्यापारी, देवस्थान समितीचे कर्मचारी व सुरक्षारक्षकांची संयुक्त बैठक घेतली.गरुड मंडपात झालेल्या या बैठकीला मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, सहसचिव शीतल इंगवले, धर्मशास्त्र अभ्यासक गणेश नेर्लेकर उपस्थित होते. यावेळी देवस्थान समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या ड्रेसकोडनुसार पेहराव करावा, गळ्यात ओळखपत्र घालणे बंधनकारक आहे. भाविकांना कोणत्याही प्रकारे मदत लागली तर तत्पर राहा, अशी सूचना दिली.
थेट प्रक्षेपणासाठी एलईडीमंदिर आवारात भाविक कोठेही असले तरी त्यांना अंबाबाईच्या पूजेचे थेट दर्शन व्हावे यासाठी परिसरात ठिकठिकाणी एलईडी टीव्ही बसविण्यात आले आहेत. गरुड मंडपासह बाह्य परिसरातील दर्शन रांगांवरील मंडप उभारणी पूर्ण झाली आहे.