इचलकरंजी : येथील सांगली रोड परिसरातील एका रेशन धान्य दुकानातून लाभार्थ्यांना दिलेल्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ आढळला. त्यामुळे याचा जाब विचारत शहर काँग्रेस समितीच्या वतीने पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे यांना निवेदन दिले. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत वितरण थांबविण्याची मागणी केली.पिवळ्या व केशरीमधील प्राधान्य गटाला रेशन दुकानातून गहू व तांदूळ वितरण केले जात आहे. अनेकवेळा या वितरणाबाबत तसेच खराब धान्य पुरवठा केल्याबद्दल तक्रारी होतात. परंतु शहरातील सांगली रोडवर परिसरात असलेल्या रेशन दुकानातून लाभार्थ्याला मिळालेल्या तांदळात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व रबरमिश्रीत तांदूळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या लाभार्थ्याने परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यासोबत जाऊन काँग्रेस समितीकडे तक्रार केली. त्यांनी याबाबत माहिती घेऊन चौकशीच्या मागणीचे निवेदन डोंगरे यांना दिले. हा गंभीर प्रकार असून, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ होत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी. तसेच दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात बाबासाहेब कोतवाल, सचिन साठे, आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी यांचा समावेश होता.
रेशनच्या तांदळात आढळला चक्क प्लास्टिक तांदूळ, कोल्हापुरातील इचलकरंजीत उघडकीस आला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 12:35 PM