कोल्हापूर : खेळाडूंनी खेळताना किंवा सराव करताना झालेल्या दुखापतींकडे दुर्लक्ष न करता त्यांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे मत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केले. शिवाजी स्पोर्टस अकॅडमी व नॉर्थस्टार हॉस्पिटलतर्फे ‘फिफा’ संघटना प्रायोजित ‘इलेव्हन प्लस इंज्युरी प्रिव्हेन्शन’ या कार्यशाळेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.शाहू छत्रपती म्हणाले, खेळाडूंनी दुखापतींकडे वेळीच लक्ष दिले तर त्यातून पुन्हा उभारी घेता येते. त्याकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण कीडा कारकिर्द धोक्यात येते. सद्य:स्थितीत खेळाडूंना बरे करण्यासाठी अनेक उपचारपद्धती व त्यावरील तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यामुळे याकडे खेळाडूंनी गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. दीपक जोशी म्हणाले, ‘फिफा’ या जागतिक फुटबॉल संघटनेने फुटबॉल खेळाचा अभ्यास करून सर्वच खेळ प्रकारातील खेळाडूंना दुखापती का व कशा होतात, शरीराचा कोणता अवयव कायमस्वरूपी जायबंदी होऊ शकतो. याकरिता इलेव्हन प्लस इंज्युरी प्रिव्हेंशन’ हा कार्यक्रम तयार केला आहे. खेळाडूंनी वॉर्मअपऐवजी संपूर्ण व्यायामप्रकाराच्या पॅकेजचा अवलंब केला पाहिजे; तरच दुखापतींचे प्रमाण ३० ते ५० टक्के कमी होईल, असे मत मांडले. यासोबतच व्हिडीओ सादरीकरणही केले.कार्यक्रमाचे उद्घाटन शाहू छत्रपती, ‘केडीसीए’चे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, जयेश कदम, माणिक मंडलिक, आदींच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. शिवाजी स्पोर्टसचे शिवाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. जोशी, सुमित पाटील, नंदकुमार बामणे, रमा पोतनीस, निवास जाधव, आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी उदय पाटील, मिथुन मगदूम, प्रमोद भोसले, संतोष पोवार, प्रदीप साळोखे, सत्यजित पाटील, डॉ. विनय मोहिते यांच्यासह खेळाडू, प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.