प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दहा ते पंधरा वर्षे आपल्या बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळातील कोल्हापूर विभागातील १२० वाहक व १४७ चालक अशा एकूण २६७ जणांची इच्छित स्थळी बदली देऊन एस.टी.ने नववर्षानिमित्त त्यांना सुखद धक्का दिला आहे. यांपैकी बहुतांश कर्मचारी हे कोकणामध्ये नोकरीनिमित्त कार्यरत होते.महाराष्ट्रातील विविध विभागांतून आलेले उमेदवार कोकणामध्ये कायमस्वरूपी नोकरी करण्यास विशेष अनुकूल नसतात, हा शासनाच्या विविध खात्यांतील अनुभव एस.टी.लाही लागू पडतो. कोकण प्रदेशासह राज्यात कुठेही जाहिरात आली की उमेदवार अर्ज करतात. निवड झाल्यानंतर रुजू होतात. मात्र, रुजू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात बदलीचा अर्ज देऊन टाकतात. त्या बदलीसाठी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, आमदार, खासदार यांचे उंबरे झिजवायला सुरुवात होते. अशा प्रकारे एस.टी.मध्ये गेली दहा-पंधरा वर्षे घरापासून लांब असलेल्या बदलीचा अर्ज देऊन प्रतीक्षा करणाऱ्या चालक-वाहकांना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निर्देशानुसार एस. टी. प्रशासनाने बदली आदेश काढून नववर्षाची सुखद भेट दिली आहे. नुसती बदली न करता त्यांना ७ जानेवारी २०१९ पर्यंत संबंधित विभागप्रमुखांनी या कर्मचाºयांना कार्यमुक्त करावे, असे आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे हे सर्व कर्मचारी आपल्या विनंतीनुसार इच्छित स्थळी रुजू होणार आहेत.चालक-वाहकांमध्ये आनंद : बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील तब्बल ३ हजार ३०७ चालक-वाहकांची त्यांच्या इच्छित स्थळी बदली झाली आहे. नोकरी लागल्यापासून १० ते १५ वर्षे घरापासून लांब असलेल्या चालक-वाहकांना आपल्या गावामध्ये किंवा गावाजवळच्या ठिकाणी बदली मिळाली असल्याने त्यांच्यामध्ये आनंद आहे.
चालक-वाहकांना विनंती बदल्यांची सुखद भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 1:07 AM