कोल्हापूर, दि. १४ : गरीब, श्रीमंत,लहान, मोठा असे सगळे भेदाभेद विसरून सगळ्यांच्या आयुष्यात प्रकाशोत्सवाचे रंग भरणाऱ्या दिवाळीचा आनंद गरजू कुटुंबांनाही मिळावा या उद्देशाने सुरू झालेल्या ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाचा शनिवारी नागरिकांच्या उदंड प्रतिसादात प्रारंभ झाला. माणुसकीचे दर्शन घडवित दिवसभरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत असे तब्बल ३५ हजारांहून अधिक चांगले कपडे या उपक्रमासाठी जमा झाले आणि दुसरीकडे त्या कपड्यांचे गरजूंना वाटपही झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. रविवारीदेखील हा उपक्रम सुरू राहणार आहे.
गोरगरिबांची दिवाळी आनंंदाने साजरी व्हावी, त्यांना किमान नवे-जुने वापरण्यायोग्य कपडे मिळावेत, या उद्देशाने गतवर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला होता. यंदाही सीपीआर चौकात उभारण्यात आलेल्या या भव्य मंडपात सकाळी दहा वाजता आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली.
वापरात नसलेले चांगले कपडे गरजूंसाठी देण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी सुरू झाली. स्वच्छ धुऊन इस्त्री केलेल्या कपड्यांनी भरलेल्या पिशव्या गाडीवरून घेऊन सर्वसामान्यांपासून ते उच्चभू्रंपर्यंतचे सर्व नागरिक सीपीआर चौकात येत होते. लहान मुलांचे कपडे, साड्या, पँट, शर्ट, ब्लँकेट, शाल, स्वेटर्स, अशा अनेकविध प्रकारच्या कपड्यांची विभागणी करून उपस्थित संयोजक व कार्यकर्त्यांना दिले जात होते.
दुसरीकडे जमा झालेले हे कपडे गरजू महिला, पुरुष व लहान मुलांना वितरित केले जात होते. ‘नको असेल ते द्या आणि हवे ते घेऊन जा’ या आवाहनानुसार अनेकजण हवे असलेले कपडे घेऊन जात होते. या ‘माणुसकीच्या भिंती’साठी अक्षरश: नागरिकांच्या संवेदनांचा झराच यानिमित्ताने पाहायला मिळाला. एकीकडे समाजाच्या निष्ठुरतेचा अनुभव येत असताना दुसरीकडे स्वयंस्फूर्तीने उपक्रमासाठी दिलेला सहभाग समाधान देणारा ठरला.
दुपारनंतर प्रतिमा पाटील यांनी या उपक्रमासाठी हजेरी लावली व स्वत: मंडपात उभे राहून कपड्यांचे वितरण केले. या उपक्रमाच्या संयोजनासाठी आमदार सतेज पाटील यांच्या मदतीने सुधर्म वाझे, गणी आजरेकर, सचिन पाटील, प्रशांत पोकळे, प्रसाद पाटील, अमर पाटील, सूरज पाटील, निनाद कामत, इम्तियाज मोमीन, डॉ. देवेंद्र रासकर, यांच्यासह अनेकजण पुढाकार घेऊन परिश्रम घेत आहेत. आज, रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रितेश देशमुख यांची उपस्थितीदरम्यान, एका चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने कोल्हापुरात आलेले अभिनेते रितेश देशमुख यांनी सायंकाळी मंडपात हजेरी लावली. आमदार सतेज पाटील यांच्यासमवेत त्यांनी गरजूंना कपडे वितरित केले. समाजानेच समाजासाठी चालविलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, त्याचे राज्यभर अनुकरण झाले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. देशमुख यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
चपलांसाठी आवाहनया उपक्रमासाठी कपडे मोठ्या प्रमाणात आले असले तरी वंचित मुलांना चपलांचीदेखील भ्रांत असते. त्यामुळे लहान मुला-मुलींसाठी कपड्यांबरोबरच चांगले वापरातले (न तुटलेले) किंवा नवीन चप्पल, बूट, सँंडल असतील तर ते उपक्रमस्थळी आणून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कपडे व साहित्य वाटपामुळे आज मी माझ्यासाठी व कुटुंबीयांसाठी चांगले कपडे घेऊ शकलो. आम्हा गोरगरिबांचे आशीर्वादच सगळ्यांना लागतील.गुलाब जमादार
महागाई इतकी वाढली आहे की, दिवाळीसाठी नवीन कपडे घेतानाही अनेकवेळा विचार करावा लागतो. सणाला असे चांगले कपडे मिळणे हीदेखील आमच्यासाठी दिवाळीच आहे.संपदा राऊत