जनावरे धुण्याच्या हौदाचा गैरवापर
कळंबा : कळंबा तलावाच्या साडेसात कोटींच्या सुशोभीकरणाच्या कामाअंतर्गत तलाव प्रदूषणमुक्त राहावा यासाठी निविदाधारक कंपनीने पंचवीस लाख रुपये खर्चून जनावरे धुण्याचा प्रशस्त हौद उभारला खरा मात्र, आता या हौदाचा वापर मद्यपी पार्टी करण्यासाठी करत असल्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासला आहे. विशेष म्हणजे या हौदाच्या शेडमध्ये दररोज रात्री मद्यपी पार्टी करत आहेत. तर कचरावेचक महिला यात कचऱ्याची पोती भरून ठेवत आहेत. त्यामुळे या हौदावर केलेला पंचवीस लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. तलावातील स्वच्छ पाणीसाठ्यावर परिणाम होऊ नये यासाठी निविदाधारक कंपनीने जनावरे धुण्यासाठी हौद बांधला. प्रवेशद्वारानजीक दोन बोअर मारून एका बोअरचे पाणी तीन इंची जलवहिनीने जनावरे धुण्याच्या हौदात सोडण्यात आले. तर दुसऱ्या बोअरचे पाणी परिसरात करण्यात आलेल्या चार हजार वृक्षांच्या संगोपनासाठी वापरण्यात आले. नोव्हेंबर २०१६ मध्ये बांधण्यात आलेल्या या हौदाचा वापर सुरुवातीला ग्रामस्थांनी जनावरे धुण्यासाठी केला. नंतर मात्र हौदाचा वापर करणे टाळत जनावरे तलावातच धुतली जातात. त्यामुळे प्रदूषण वाढतच असल्याचे चित्र आहे. या तलावाचा वापर उपनगरे व लगतच्या ग्रामीण नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे.मात्र, असे असूनही त्याच्या प्रदूषणमुक्तीसाठी कोणतेच प्रयत्न पालिका व कळंबा ग्रामपंचायतीकडून होत नाहीत. त्यामुळे या तलावाची दुर्दशा झाली आहे.
चौकट : प्रशासनाची अनास्था
तलावावर कर्मचारी नियुक्त नसल्याने वीस एकरांत अतिक्रमण झाले आहे. हा तलाव प्रेमीयुगले, मद्यपींचा अड्डा बनला आहे. जनावरे धुणे, आंघोळ यामुळे पाणीप्रदूषित होत असून तलाव संवर्धनाबाबतीत प्रशासनाची अनास्था आहे.
फोटो : ०७ कळंबा तलाव
कळंबा तलावातील पाणी प्रदूषणमुक्त राहावे यासाठी पंचवीस लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जनावरे धुण्याच्या हौदात कचऱ्याची पोती ठेवली आहेत.