कोल्हापूर : सरकारच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या आदेशानुसार अकृषिक जमिनीचे (एनए प्लॉट) तुकडे पाडून खरेदी-विक्री करण्यासाठी आता सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेण्याची गरज आहे. ही प्रक्रिया करून त्यावर गृहनिर्माण प्रकल्प बांधण्यास विलंब लागणार आहे. परिणामी घराची किंमत दहा ते १५ टक्क्यांनी वाढेल, अशी शक्यता काही बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली. यामुळे सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नावर परिणाम होणार आहे.
दिवसेंदिवस जमिनीचे भाव गगनाला भिडत आहे. शहरातील आणि शहरालगतच्या जागेला सोन्याच्या भाव आला आहे. यातूनच जमिनीचे तुकडे करून विक्री आणि खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू असतानाही पैशासाठी जमिनीचे तुकडे करून प्लाॅटची नियमबाह्यपणे खरेदी, विक्री होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. शिवाय नियमबाह्यपणे खरेदी केलेल्या जमिनीसंबंधीचे वाद वाढत आहेत. ते न्यायप्रविष्ट झाल्यानंतर संंबंधित जमीन किंवा प्लॉट खरेदी करणाऱ्यांना आणि विकणाऱ्यांना त्रास होत आहे. यामुळे जिल्हाधिकारी, प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या परवानगीच्या लेआऊटमधील प्लॉटचीच रीतसर खरेदी, विक्री करणे बंधनकारक केली आहे.
१) काय आहे नवा निर्णय
एखाद्या सर्व्हे नंबरचे (गट नंबर) क्षेत्र दोन किंवा त्यापेक्षा जास्त एकर आहे. त्याच सर्व्हे नंबरमधील तुम्ही एक, दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेणार असाल, तर त्याची दस्त नोंदणी होणार नाही. म्हणजे तुम्ही ती शेतजमीन विकत घेतली तरी ती तुमच्या नावावर होणार नाही. म्हणून नव्या आदेशानुसार विक्रीसाठीचा संपूर्ण सर्व्हे नंबरचा ले-आऊट करून त्यामध्ये एक, दोन गुठ्यांचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल, तर अशा मान्य ले-आऊटमधील एक, दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्तनोंदणी होऊ शकणार आहे.
२) काय होणार परिणाम
नव्या आदेशामुळे जमीन, जागा, प्लाॅट खरेदीनंतरचे वाद, न्यायप्रविष्ट प्रकरणे कमी होतील. पण या आदेशातील सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून घेण्यास विलंब लागणार आहे. क्लिअर टायटल असणाऱ्या जागा कमी होत असल्याने त्यांचा भाव आतापेक्षा अधिक वाढेल. जागेची किंमत वाढल्याने घराची किंमत वाढेल, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.
३) कोट
नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या नव्या आदेशामुळे जमीन खरेदीनंतरचे वाद निर्माण होणार नाहीत. वाद नसलेल्या प्लॉटवरील घर घेतल्यास मालकास भविष्यात कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे हा आदेश चांगला आहे.
रोनक शहा, बांधकाम व्यावसायिक
कोट
जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल, तर अशा मान्य ले-आऊटमधील एक, दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्तनोंदणी होऊ शकणार आहे. हा निर्णय चांगला आहे.
अतुल पवार, बांधकाम व्यावसायिक
४) मोठ्या जागेसाठी पैसा आणणार कोठून?
महागाई प्रचंड वाढल्याने जागा घेऊन घरे बांधणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. तुकडेबंदीच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याने मोठी जागा घेण्यासाठी पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न उभा राहत आहे.
सुधीर कानडे, शेतकरी
तुकडेबंदीमुळे मोठी जागा घेऊन घर बांधणे अशक्य आहे. यामुळे पूर्वीप्रमाणे सरकारने एक, दोन गुंठे भूखंड खरेदी करण्याची परवानगी द्यावी.
कुमार पाटील, वाहनचालक