कोल्हापूर : गोकुळमध्ये सभासदत्व राहण्यासाठीची वर्षाला २४० दिवस ५० लिटरची दूध संकलनाची अट रद्द करण्यास विरोध आहे. आपल्या बोगस संस्थांची संख्या वाढवण्यासाठी ही अट सत्ताधारी काढत आहेत. अप्रत्यक्षपणे संघाच्या खासगीकरणाला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. गोकूळची आज, शुक्रवारी वार्षिक सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गोकुळच्या कामकाजावर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.त्या म्हणाल्या, गोकुळच्या लेखापरीक्षण अहवालानुसार कार्यक्षेत्राबाहेरील दूध संकलनाचे प्रमाण गेल्यावर्षी ८०.२१ टक्के होते. यंदाच्या अहवाल सालात ७१.९१ टक्के इतके आहे. या अहवाल सालात घट झालेली आहे. यावरून केवळ संस्था वाढवल्या आहेत. पण त्या तुलनेत दूध वाढलेले नाही. जे वाढले आहेत. ते कार्यक्षेत्राबाहेरील आहे. चालू वर्षाच्या अंतिम दर फरक १०६.७९ कोटी देण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी हाच दर ११०.४९ कोटी इतका होता. गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या दर फरकात ३.७० कोटी इतकी घट झाली आहे.गोकुळच्या दुधाला चांगली मागणी असतानाही मार्केटिंगचे तंत्र चुकल्याने गेल्या वर्षापेक्षा ०.१६ कोटी लिटर्सनी घट झाली आहे. गोकूळ दूध संघातर्फे पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय सुरू करून कोणाच्या तरी घशात घालण्याचा घाट घातला आहे. संघाचे भांडवल घालून महाविद्यालय सुरू करणे आणि ते दुसऱ्याला देणे याला विरोध आहे. संघाचा दुधाचा धंदा आहे. तोच त्यांनी करून उत्पादकांना आणखी चांगला दर द्यावा. यावेळी राजवर्धन निंबाळकर, डॉ. अशोक माने आदी उपस्थित होते.
विक्री अधिकाऱ्यांना घेऊन फायदा काय ?गोकुळने जगदीश पाटील नावाच्या विक्री अधिकाऱ्यास महिन्याला अडीच लाख रुपये पगार, वाहन अशी सेवा देते. ते यापूर्वी गोकुळमधून व्हीआरएस घेऊन सर्व लाभ घेतले आहेत. तरीही त्यांनाच विक्री अधिकारी म्हणून घेऊन गोकूळला फायदा काय झाला ? प्रत्यक्षात दूध, दुग्धजन्य उत्पादनात घट झाली आहे. पाटील यांनी त्यांच्या जॉब चार्टनुसार काम केलेले नाही, असा आरोपही महाडिक यांनी केला.