कोल्हापूर : बजाज फायनान्सद्वारे कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी तरुणास ५७ हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. संशयित अमित शर्मा, नीलम चौहान अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या फायनान्स कंपनीचा डाटा चोरीला गेला आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही. त्यामुळे दिल्लीतून भामटे ग्राहकांशी या फायनान्स कंपनीच्या नावे संपर्क साधून फसवणूक करीत आहेत. अशा प्रकारे कोल्हापुरातील १० ते १५ लोकांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादी शब्बीर सिकंदर मुजावर (वय ३५, रा. सुदर्शन हौसिंग सोसायटी, टेंबलाईवाडी) यांनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी सांगितले, शब्बीर मुजावर यांचा वाहनदुरुस्तीचा व्यवसाय आहे. २ एप्रिल ते ९ मेच्या दरम्यान घरी असताना संशयित अमित शर्मा याचा मोबाईलवर फोन आला. ‘मी दिल्लीतून बजाज फायनान्समधून बोलतोय. तुमचा मोबाईल नंबर लकी आहे. तुम्हाला कंपनीकडून दोन लाखांचे कर्ज तत्काळ सहा टक्के व्याजाने मंजूर करण्यात येणार आहे,’ असे सांगून नाव, पत्ता आणि व्यवसायाची माहिती घेतली. त्यानंतर नीलम चौहान या महिलेने संपर्क साधून तुमची कागदपत्रे आॅनलाईन पाठवून द्या, असा निरोप दिला.
व्हॉट्स अॅपवर त्यांना कर्जमंजुरीचे संदेश आणि त्यासाठी लागणारा अर्ज ई-मेल केला. मुजावर यांनी एक-दोन वेळा कोल्हापुरातील बजाज फायनान्सच्या कार्यालयात चौकशी केली असता, त्यांनीही अशा प्रकारे कर्ज दिले जात असे सांगितले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यांनी संशयित शर्मा आणि चौहान जसे सांगतील त्या पद्धतीने बँकेतील खात्यावरून नेटबँकिंगद्वारे ५७ हजार ६७८ रुपये भरले. अर्जामध्ये त्रुटी असल्याचे सांगून भामटे जमादार यांच्याशी वारंवार आणखी पैसे भरण्यासाठी संपर्क साधत होते. मुजावर यांनी फायनान्स कंपनीतील शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्याकडून अशा प्रकारे कर्ज दिले जात नाही, आमचा डाटा चोरीला गेला आहे. तुमच्या प्रकरणाशी आमचा काही संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजताच मुजावर यांनी सायबर विभागाकडे तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांची चौकशी केली असता फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यानंतर राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुनील पाटील अधिक तपास करीत आहेत.