कोल्हापूर : लेखक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित चित्र-शिल्प प्रदर्शनाला प्रारंभ झाला. यानिमित्त ‘अशी पाखरे येती’ ही मराठी गीतमैफल आणि अभिवाचन असे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कलामहर्षी बाबूराव पेंढारकर कलादालन भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवाजी मस्के, मनोज दरेकर, विजय टिपुगडे आणि शिल्पकार सतीश घारगे, प्रशांत जोशी उपस्थित होते.या प्रदर्शनात पु. ल. देशपांडे यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याचा विचार करून दिग्गज कलाकारांच्या दर्जेदार कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. दरम्यान, पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. सायंकाळी प्रदीप पाटील व धनंजय पाटील यांचा अभिवाचनाचा कार्यक्रम झाला.
त्यानंतर ‘भक्तिगंध’ प्रस्तुत ‘अशी पाखरे येती’ ही मराठी गीतमैफल सादर करण्यात आली. त्यात गायक रणजित बुगले, गंगाराम जाधव, वैदेही जाधव यांनी स्वरसाज चढविला. त्यांना स्वानंद जाधव, विजय येतावडेकर, शिवाजी सुतार, जयवंत पाटील यांनी साथसंगत केली. ऐश्वर्या बेहेरे यांनी सूत्रसंचालन केले. हे प्रदर्शन गुरुवारपर्यंत (दि. २८) सकाळी ११ ते रात्रौ ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. तरी कोल्हापुरातील रसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.