इचलकरंजी : पी.एम. ई-बस जानेवारीमध्ये इचलकरंजीत दाखल होणार आहेत. त्यामुळे बस स्थानकाच्या निर्मितीचे काम सोलगे मळ्यामध्ये वेगाने सुरू आहे. सिटी बससाठी आगार व्यवस्थापकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.केंद्र सरकारच्या मदतीतून शहरामध्ये सिटी बस सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी इचलकरंजीला सुमारे वीस बस मंजूर झाल्या आहेत. जानेवारीत महापालिकेकडून या बस दाखल होणार आहेत. बसस्थानकासाठी सोलगे मळ्यामध्ये जागा निश्चित केली आहे. या जागेवर बस स्थानक, चार्जिंग स्टेशन होणार आहे. बस स्थानकासभोवती कम्पाउंड बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. छत उभारणीसाठीही आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.काम जरी वेगाने सुरू असले, तरी हे काम पूर्णत्वास जाण्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. असे असले, तरी पुढील महिन्यात बस दाखल होणार असल्याने शहरातील प्रवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या बस शासन नियुक्त ठेकेदारामार्फत चालविण्यात येणार आहेत. बस चालविण्यासाठी चालक ठेकेदार उपलब्ध करून देणार आहे, तर वाहक महापालिका भरून घेणार आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेवानिवृत्त आनंदा दोपारे यांची आगार व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली आहे. दोपारे यांनी येथील बसस्थानकामध्ये सहायक वाहतूक निरीक्षक म्हणून ३२ वर्षे सेवा केली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा नव्याने सुरू होणाऱ्या पी.एम. ई-बससाठी होणार आहे.नवीन पदांना मंजुरी आवश्यकमहापालिकेचा आकृतीबंध तयार करताना, त्यामध्ये बसचालक व इतर पदांचा समावेश करण्यात आलेला नाही. बस सुरू झाल्यानंतर काही पदे महापालिकेला तात्पुरत्या स्वरूपात भरून घ्यावी लागणार आहेत. त्यानंतर राज्य सरकारकडून पदे मंजूर करून आणून त्याचा समावेश आकृतीबंधामध्ये करावा लागणार आहे. त्यानंतर बसला आवश्यक असणारी पदे कायमस्वरूपी मिळणार आहेत.
Kolhapur: इचलकरंजीत जानेवारीमध्ये पी.एम. ई-बसेस सेवेत दाखल होणार, बस स्थानक निर्मितीच्या कामाला गती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 5:59 PM