कोल्हापूर: पीएम किसान अंतर्गत प्रती शेतकरी दोन हजारांचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. या हप्त्याचे जिल्ह्यातील एक लाख ६० हजार शेतकरी लाभार्थी ठरले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मार्च २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेची घोषणा केली. त्यानुसार वार्षिक सहा हजार रुपये तीन महिन्यांच्या तीन हप्त्यांत देण्यास सुरुवात केली.
सातबारा व आधारकार्ड एवढ्या पुराव्यावर ही रक्कम जमा करण्यात येऊ लागली. जिल्ह्यातील चार लाख ३७ हजार ८३१ शेतकऱ्यांना मार्च महिन्यात पहिला हप्ता मिळाला. त्यानंतर दर तीन महिन्यांनी ही रक्कम जमा होऊ लागली.मध्यंतरी लाभार्थी पडताळणी आणि बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेमुळे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली. पहिल्या हप्त्यात सव्वाचार लाखावर गेलेली लाभार्थी संख्या पाचवा हप्ता जमा होईपर्यंत केवळ ३१ हजारांवर आली. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी केलेली जनजागृती आणि स्वत: शेतकऱ्यांचा पुढाकार यामुळे पुन्हा लाभार्थी संख्या वाढू लागली आहे.
यावर्षी शेवटचा हप्ता मे महिन्यात जमा झाला होता. त्याचा लाभ जिल्ह्यातील एक लाख ६६ हजार ८६७ शेतकऱ्यांनी घेतला होता. आता ऑगस्टमध्ये आणखी एक हप्ता जमा होत आहे. शेतकऱ्यांना त्याचे एसएमएसही प्राप्त होत आहेत.