इचलकरंजी : हिंदी कवितांच्या प्रभावी सादरीकरणामुळे येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या हिंदी कवी संमेलनात रंगत आली. सागर त्रिपाठी, शकील आझमी, मुजावर मालेगावी, प्रज्ञा विकास, वर्षा बरखा, स्मिता आरजू, अजीम साद, सोहेल आझाद, शरदेंदू शुक्ल, इरफान शहानुरी व मेजर अजीम यांनी व्यंगात्मक हास्यतुषार, हळव्या शब्दांची पाखरण, गझलांचे गहिरी सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.येथील मनोरंजन मंडळ, रोटरी क्लब सेंट्रल, दगडुलाल मर्दा फौंडेशन, मारवाडी युवा मंच, ह्युमन वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट आणि सांस्कृतिक कार्य संचलनालयांच्यावतीने कवी संमेलन आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी कवी सागर त्रिपाठी होते. संजय होगाडे यांनी स्वागत व ओम पाटणी यांनी प्रास्ताविक केले. सागर त्रिपाठी यांनी सरस्वती वंदना हे गीत गायिले. ‘हे देखना है गरिबी में साथ देगा कौन, यही वक्त है आपनों को आजमाने का’ ही कवी अजीम साद यांची गझल श्रोत्यांची दाद घेऊन गेली. कवयित्री स्मिता आरजू यांनी प्रखर व्यंग व्यक्त करणारी प्रेम कविता सादर केली. स्त्री-भ्रूण हत्येवरील त्यांची ‘बेबस कविता रोती है, कोख में हत्या होती है, सृष्टी की जो जननी है, अंगारो पे सोती है’ ही कविता अंतर्मुख करायला लावणारी होती. बरखा यांनी देशप्रेमाची प्रचिती काव्यातून दिली. सोहेल आझाद यांच्या ‘हिंदी, मुस्लिम, शिख, इसाई कहते है, हिंदोस्तान हमको जान से प्यारा है, तन से जुदा ये सर भी कर डालोगे, कहते रहेंगे हिंदोस्तान हमारा है’ या काव्यपंक्ती रसिकांच्या दाद घेऊन गेल्या. शरदेंदू शुक्ल यांनी राजकीय व सामाजिक घटनांवर व्यंगात्मक कविता सादर केल्या. इरफान शहानुरी व प्रज्ञा विकास यांनीही कविता सादर केल्या. त्रिपाठी यांनी ‘बस दुकान के खोलते ही जोक सारे बिक गये, एक तनहा सच के लिए मै शाम तक बैठा रहा’ यांनी दाद मिळविली. अमर डोंगरे यांनी आभार व्यक्त केले. (प्रतिनिधी)हिंदी चित्रपट गीत व गझलाकार शकील आझमी यांच्या गझला थेट काळजाला हात घालणाऱ्या होत्या. ‘जो तेरे अैब बताते है उसे मत खोना, अब कहॉँ मिलते है आइने दिखानेवाले’, ‘पहन के झुठी हसी मैहफिलमें जाना क्या, उदास है उदासी मे मुस्कुराना क्या’, ‘परो को खोल, जमाना उडान देखता है, जमीन पे बैठके क्या आसमान देखता है’ या गझलांना टाळ्या मिळाल्या.
कवितांनी इचलकरंजीतील रसिक मंत्रमुग्ध
By admin | Published: September 23, 2014 9:40 PM