गडहिंग्लज : सुट्टीवर गावी आलेल्या जवानाला पत्नी व तिच्या अनोळखी साथीदाराने डोळे आणि हात-पाय बांधून नाका-तोंडावाटे विष पाजून जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. याप्रकरणी पत्नी तेजस्विनी अमर देसाई (मूळ गाव नूल, ता. गडहिंग्लज, सध्या रा. पाटणे पाईप कारखान्याजवळ संकेश्वर रोड, गडहिंग्लज) हिला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या अज्ञात साथीदाराचा पोलिस कसून शोध घेत आहेत. दोघांच्याविरूद्ध भारतीय न्याय संहितेनुसार (बीएनएस) गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे नूल पंचक्रोशीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, नूल येथील जवान अमर भिमगोंडा देसाई हे भारतीय सैन्यदलात जम्मू-काश्मिर येथे कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी येथील पाटणे पाईप कारखान्याजवळ दुमजली घर बांधले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या पत्नी तेजस्विनी या मुलगा व मुलीसह गडहिंग्लजमध्ये राहतात. अमर हे सध्या सुट्टीवर गावी आले आहेत.गुरूवारी (१८) रात्री साडेनऊच्या सुमारास जेवणानंतर अमर हे घरात झोपले होते. त्यावेळी तेजस्विनी व तिच्या अनोळखी साथीदाराने संगनमताने त्यांचे डोळे आणि हात-पाय बांधून नाका-तोंडावाटे त्यांना विष पाजले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या अमर यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला.अमर यांच्या ओरडण्यामुळे जमलेल्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी ‘त्या’ अनोळखी साथीदाराने मदतीसाठी धावलेल्या खाडे यांच्या डोकीत कशानेतरी मारहाण करून पलायन केले.दरम्यान, घटनास्थळी जमलेल्या लोकांनीच अमर आणि खाडे यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. अमर यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार अधिक तपास करीत आहेत.नूल पंचक्रोशीत खळबळ !जवान अमर यांचे मूळगाव नूल असून तेजस्विनी हिचे माहेर हेब्बाळ काानूल आहे. लग्नानंतर कांही वर्षे हेब्बाळमध्ये वास्तव्यास होते. दरम्यान, त्यांनी गडहिंग्लजमध्ये घर बांधले असून मुलांच्या शिक्षणासाठी ते गडहिंग्लजमध्ये राहतात. या घटनेमुळे नूल, हेब्बाळसह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. अत्यवस्थ जवानाला पुण्याला हलवले!गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर अत्यवस्थ जवान अमर यांच्यावर पुणे येथील सैन्य दलाच्या रूग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत,अशी माहिती पोलिसांनी दिली.
हात-पाय बांधून जवानावर पत्नीकडून विषप्रयोग, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 11:59 AM