कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वत्र राज्य शासनाने लावलेले निर्बंध काही अंशी कमी होत आहेत. त्यामुळे हजारो दुचाकी रस्त्यावर येऊ लागल्या आहेत. यात अनेकांच्या दुचाकीला चारचाकीचे कर्णकर्कश हाॅर्न बसविण्यात आले आहेत. त्यामुळे असे हाॅर्न सिग्नल अथवा गर्दीच्या ठिकाणी अचानकपणे सलगपणे वाजले तर माणसांच्या श्रवण क्षमतेवर परिणाम होऊन पडद्यासह आतील नसही कमजोर होऊ शकते. त्यामुळे फटाक्यांसह विविध मोठे आवाज करणाऱ्या हाॅर्न बसविणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्याची आवश्यकता आहे. असे अनेक वाहनधारकांचे मत बनले आहे.
जसे कोल्हापूरकर फॅन्सी क्रमांकासाठी राज्यात प्रसिद्ध आहेत, तसे कर्णकर्कश आणि विविध आवाजांतील हाॅर्न बसविण्यासाठीही प्रसिद्ध आहेत. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्हा प्रशासनाने निर्बंध काहीअंशी कमी केले आहेत. त्यामुळे अचानकपणे हजारो वाहने दुपारपर्यंत रस्त्यावर येतात. त्यामुळे गर्दी वा सिग्नलच्या ठिकाणी प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असते. अशा काळात प्रत्येक जण हाॅर्न वाजवून पुढील वाहनधारकाला बाजूला होण्याचे सांगत असतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी ६० ते ७० डेसिबलपर्यंतचा आवाज या कर्णकर्कश हाॅर्नमधून निर्माण होतो. त्याचा थेट परिणाम मानवी शरीरावरही होत आहे. जर या हाॅर्नचा सलगपणे ६० ते ७० डेसिबल इतका आवाज कानावर पडला तर कानाच्या पडद्यासह आतील नस ही कमजोर बनू शकते आणि ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे हाॅर्न न बसविणेच योग्य आहे; परंतु हौशी वाहनधारक काहीतरी वेगळे आणि आपण वेगळे असल्याचे दाखविण्यासाठी कधी कुत्रे भुंकल्याचे, तर कधी रेडा हंबरल्याचेही हाॅर्न बसवून अन्य वाहनधारकांना अचानकपणे धक्का देतात, तर काही बुलेटचालक तर सायलेन्सरद्वारे मोठ्या आवाजाचे फटाके फोडत असल्याचा भास निर्माण करीत आहेत. त्यामुळे अनेकदा अचानकपणे असा आवाज होऊन कान सुन्न होण्याचे प्रकार घडत आहेत.
फॅन्सी हाॅर्नची हौस
कोल्हापूरकर आपल्या वाहनाला फॅन्सी क्रमांक हवा म्हणून लाखो रुपये खर्च करतात. त्याप्रमाणे आपल्या वाहनाला वेगळ्या पद्धतीचा हाॅर्न बसविण्यासाठी हजारो रुपये मोजण्यास कमी पडत नाहीत. त्यामुळे अनेकांच्या दुचाकीला ट्रकचा एअर पंप असल्यासारखे कर्कश हाॅर्न बसविण्यात आले आहेत. अनेकांनी वेगवेगळ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाचे, तर काहींनी रेडा, म्हैस हंबरण्याचे आवाज असलेले हाॅर्न आपल्या वाहनाला बसविले आहेत. यासह मोठ्या डेसिबलचे हाॅर्नही दुचाकीला बसविले आहेत. विशेष म्हणजे एक हाॅर्नऐवजी मेल-फिमेल जोडी बसविण्याची फॅशनच आली आहे.
कानाचे आजार वाढू शकतात
कानाला ठराविक डेसिबलपर्यंत नाॅर्मल म्हणून ऐकण्याची सवय असते. मात्र, वारंवार गोंगाट आणि ६० ते ७० डेसिबलचा आवाज सातत्याने कानावर पडला तर श्रवण क्षमता कमकुवत होण्याचा धोका अधिक आहे. विशेष म्हणजे गर्दी अथवा सिग्नलवर एखाद्या वाहनधारकाने ६० ते ७० डेसिबलचे हाॅर्न सलगपणे वाजविले तर त्याचा निश्चितच मानवी कानाच्या पडद्यासह आतील नसवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ट्रक अथवा अवजड वाहनाला वापरणारे हाॅर्न दुचाकीला बसवू नयेत.
- प्रा. डाॅ. अजित लोकरे, विभागप्रमुख, कान, नाक, घसा, सी.पी.आर. रुग्णालय आणि राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
कोट
कर्णकर्कश हाॅर्नसह बुलेटमधील सायलेन्सरमध्ये बदल घडवून मोठे आवाज काढणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सातत्यपूर्ण कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये असे हाॅर्न बसविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. असे हाॅर्न आढळल्यास कडक कारवाई केली जाईल.
-स्नेहा गिरी, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, कोल्हापूर
कारवाई अशी
कारवाईचा प्रकार - २०२०(केसेस) दंड २०२१ (केसेस) दंड
सिग्नल जंप - १४०३ २,८०, ६०० १२२३ २, ४४, ६००
नो पार्किंग - ६५६१ १३, १२, २०० ४०४२ ८,०८४, ४००
कर्णकर्कश हाॅर्न - ८८ ४४, ००० १४६ ७३,०००