संदीप बावचे ।शिरोळ : सांगली पोलिसांचे प्रकरण ताजे असतानाच शिरोळमधील तरुणाच्या आत्महत्येनंतर पोलीस दलातील एकमेकांची पाठराखण करण्याच्या प्रयत्नांत ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची वेळ पुन्हा एकदा पोलिसांवर आली. ब्लॅकमेलिंगच्या कारणातून तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीला अधिकाºयांकडून बेदखल करण्याचा प्रयत्न झाला.
लोकांच्या उद्रेकानंतर वरिष्ठ अधिकाºयांना घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी लागली. कृष्णा नदीकाठी असलेल्या सांगली व शिरोळच्या घटनेमुळे दोन्ही जिल्ह्यांतील पोलीस दलात अस्वस्थता निर्माण झाली आहे.शिरोळ येथील टेम्पोचालक राजाराम माने याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. ५) घडली. झिरो पोलिसाने बलात्काराचा गुन्हा दाखल होईल, अशी भीती घालून राजारामकडून पैसे उकळण्याचा प्रकार पुढे आला. या कटात शिरोळ पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलचाही सहभाग दिसून आल्याने नातेवाइकांनी थेट पोलीस ठाणे गाठले.
राजारामच्या मृत्यूस पोलीस कॉन्स्टेबलच जबाबदार असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाइकांसह ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. मात्र, मूळ मागणी बाजूलाच ठेवत एकमेकांची पाठराखण करण्याच्या प्रयत्नात अधिकाºयांनी त्या पोलीस कर्मचाºयाला संशयित आरोपी म्हणून रेकॉर्डवरच घेतले नाही. त्यामुळे जनतेच्या रोषाला पोलिसांना सामोरे जावे लागण्याची वेळ आली.या घटनेचे पडसाद उमटणार आणि नागरिकांनी काढलेला मोर्चा व बेमुदत गाव बंदचा इशारा यामुळे अखेर लोकांच्या दबावापुढे पोलिसांना नमते घ्यावे लागले. त्या पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली. वास्तविक, सुरुवातीला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्या पोलिसावर गुन्हा दाखल केला असता तर ग्रामस्थांना तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली नसती.
कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीसप्रमुखांनी याप्रश्नी लक्ष घालून नागरिकांच्या भावना समजून घेतल्या. सांगली प्रकरणामुळे पोलीस खाते चर्चेत असताना शिरोळमधील तरुणाच्या आत्महत्येस पोलीस कॉन्स्टेबल जबाबदार असल्याचे प्रकरण पुढे आल्याने पुन्हा एकदा पोलिसांविषयी नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. पोलीस खात्यात अशा प्रकारच्या लहान मोठ्या घटना पोलिसांकडून घडत आहेत. मात्र, योग्यवेळी अधिकारी त्याची गांभीर्याने दखल घेत नाहीत.शिरोळसारख्या घटनेनंतर वरिष्ठ अधिकारी जागे होतात. पोलिसांविषयी नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भावना दूर करण्यासाठीच येणाºया काळात प्रयत्न होणे गरजेचे आहे.कुटुंबावर दु:खाचा डोंगरमृत राजाराम माने हा टेम्पो व्यावसायिक होता. त्याच्यावर घरची जबाबदारी होती. या व्यवसायातूनच माने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. माने याने आत्महत्या केल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.संशयिताचे कारनामेझिरो पोलीस म्हणून काम करणाºया त्या तरुणाची शिरोळ पोलीस ठाण्यात चांगलीच ऊठबस होती. गावातील कोणतेही प्रकरण असो, पोलिसांची भीती घालून तोंडपाणी करण्यात तो पुढे असायचा. शिरोळ तरुणाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी या प्रकरणामागे रॅकेट आहे का? या अनुषंगाने तपास सुरू केला असला तरी संशयिताच्या गावातूनच अनेक कारनामे उघडकीस येणार आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करण्याची गरज आहे.पोलीस खाते चर्चेतराजाराम माने याची ब्लॅकमेलिंगमधूनच आत्महत्या झाल्याचा आरोप नातेवाइकांसह ग्रामस्थांनी शिरोळ पोलिसांकडे केला होता. या प्रकरणात शिरोळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयाचे नाव आल्यानंतर त्याचवेळी अधिकाºयांनी का दखल घेतली नाही, हा प्रश्न पुढे आला असून, नागरिक रस्त्यावरच उतरल्यानंतर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे पोलीस खाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.