कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिकाकडे दहा हजार रुपये लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल दिग्विजय पांडुरंग मर्दाने (३५, रा. शिंगणापूर, ता. करवीर) याला सोमवारी (दि. १७) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी केली. दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली, त्यापैकी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारून आणखी दहा हजारांची लाचेची मागणी केली होती.अधिक माहिती अशी की, नागाळा पार्कमधील बांधकाम व्यावसायिक धीरज अनिल साखळकर (३७, रा. एव्हरग्रीन होम, नागाळा पार्क) यांच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय मर्दाने याने त्यांना गुन्ह्याच्या कामात मदत करण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली तसेच त्याने तपास अधिकारी यांच्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेतली. आणखी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत साखळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पथकाच्या पडताळणीमध्ये कॉन्स्टेबल मर्दाने याने तपास अधिकाऱ्यांसाठी २५ हजारांची लाच स्वीकारल्याचे मान्य करून तसेच दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरून पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय मर्दाने यांना अटक केली. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकातील हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, मयूर देसाई, संदीप पडवळ, रूपेश माने आदींनी केली.
लाचप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल अटकेत, दहा हजार रुपयाच्या लाचेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 5:07 PM