कोल्हापूर : यादवनगर-पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करून पसार झालेल्या मुल्ला गँगचा मुख्य म्होरक्या सलीम मुल्लासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. संशयित सलीम यासीन मुल्ला (वय ४१), त्याचा भाऊ फिरोज मुल्ला (२८), अभिजित अनिल येडगे (३०, तिघे, रा. यादवनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून तीन मोबाईल, १५ हजार रोकड जप्त केली. त्यांना आज, सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.जयसिंगपूर-मिरज रोडवर निलजी फाटा येथे नायकवडी मोहल्ला या वस्तीतील तहसीलदार यांच्या शेतामध्ये असलेल्या शेडमध्ये लपून बसले असताना छापा टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली. यादवनगर येथील ‘मुल्ला’ गँगचा म्होरक्या सलीम मुल्ला याच्या मटका अड्ड्यावर ८ एप्रिलला रात्री प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकाने छापे टाकले होते. आयपीएस शर्मा यांचा बॉडीगार्ड निरंजन बाळासाहेब पाटील व कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर विठ्ठल माळी यांना जमावाने मारहाण करून पाटील याने संरक्षणार्थ काढलेले पिस्तूल काडतुसांसह संशयित नीलेश काळे याने पळवून नेले होते. याप्रकरणी पोलिसांनी ४० जणांवर गंभीर गुन्हा दाखल करून माजी उपमहापौर शमा मुल्लासह नीलेश दिलीप काळे, राजू यासिन मुल्ला, सुंदर रावसाहेब दाभाडे, पिंपू ऊर्फ सलमान आदम मुल्ला (सर्व, रा. यादवनगर) आदी २५ जणांना अटक केली आहे. यावेळी काळे याच्याकडून पिस्तूल हस्तगत केले. हे सर्वजण पोलीस कोठडीत आहेत. सलीम मुल्ला, फिरोज मुल्ला, जावेद मुल्ला, अभिजित येडगे व आणखी काही साथीदार पसार होते. सलीमसह काही साथीदार जयसिंगपूर-मिरज रोडवरील एका वस्तीमध्ये लपून बसल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. उपनिरीक्षक दादाराजे पवार, हवालदार इकबाल महात, राजू आडूळकर, अमोल कोळेकर, सुरेश पाटील, राम कोळी, जितेंद्र भोसले यांनी छापा टाकून तिघांच्या मुसक्या आवळल्या. चौघेही संशयित सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, लूटमार, मारहाणीसह मटका, जुगाराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. घटनेपासून सलीम व त्याचे साथीदार निपाणी, जत, इंगळी, आदी भागांत फिरत होते. गेल्या तीन दिवसांपासून ते नायकवडी मोहल्ला येथील तहसीलदार यांच्या शेतातील शेडमध्ये थांबून होते. संशयितांना राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले असून, पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत.मोक्का कारवाईतही होणार अटकसंशयितांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, शासकीय कामात अडथळा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, एकत्र जमाव करून हाणामारी करणे, अवैध व्यवसाय चालविणे अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांचे गुन्हे दाखल करून ५० गुन्ह्यांचा समावेश केला आहे. या सर्वांना पोलिसांवरील हल्ल्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोक्का कलमाखाली दुसऱ्यांदा अटक करून पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पोलिसांवर हल्लाप्रकरणी सलीम मुल्लासह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:56 AM