कोल्हापूर : कुशिरे तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथे फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान केंद्रावर लुडबुड करणाऱ्या सरपंचास बंदोबस्तावरील पोलिसाने हटकले होते. त्या रागातून पोलिसास मारहाण करणाऱ्या सरपंचासह तिघांना तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. जगताप यांनी दोष ठरवून सहा महिने सश्रम कारावास आणि साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी (दि. १२) सुनावली.तत्कालीन सरपंच विष्णू गणपती पाटील (वय ६१), अमर मारुती गडकरी (३७) आणि धनाजी महिपती साबळे (३०, तिघे रा. कुशिरे तर्फ ठाणे) अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदानादरम्यान तत्कालीन सरपंच विष्णू पाटील हे मतदान केंद्रावर वारंवार लुडबुड करीत होते.
याबाबत बंदोबस्तावरील कॉन्स्टेबल अजित विश्वास शिपुगडे यांनी हटकले असता, पाटील यांच्यासह अमर गडकरी आणि धनाजी साबळे या तिघांनी कॉन्स्टेबल शिपुगडे यांना बेदम मारहाण केली. शिपुगडे यांच्या फिर्यादीनुसार कोडोली ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.न्यायालयात ११ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. काही साक्षीदार आणि निवडणूक कर्मचारी फितूर झाले. मात्र, फिर्यादींची साक्ष, वैद्यकीय तपासणीचा अहवाल आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी तिघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली.