कोल्हापूर : यादवनगर-पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह त्यांच्या पथकावर माजी उपमहापौर शमा मुल्ला, तिचा पती सलिम मुल्ला याच्यासह चारशेजणांच्या जमावाने हल्ला करीत बेदम मारहाण केली. यावेळी सलिम यासिन मुल्ला याने शर्मा यांचा बॉडीगार्ड निरंजन पाटील यांचे कपडे फाडून त्यांच्या कंबरेचे सर्व्हिस पिस्तूल जबरदस्तीने हिसकावून घेत, धाक दाखवून फरार झाला. पिस्तूल रोखल्याने शर्मा यांच्यासह अन्य पोलिसांना काहीच करता आले नाही. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली.प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक शर्मा या प्रकाराने बिथरुन गेल्या होत्या. त्यांनी तत्काळ कंट्रोल रुमला वायरलेसवरून मॅसेज दिला. काही क्षणातच राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, करवीर, जुना राजवाडा, शाहूपुरी, स्थानिक गुन्हे शाखा, गांधीनगर, राज्य राखीव दल, जलद कृती दलाचे जवान अशा दोनशे पोलिसांचा फौजफाटा सशस्त्र हत्यारांसह घटनास्थळी दाखल झाला. अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, संजय मोरे, वसंत बाबर घटनास्थळी आले. त्यांनी ऐश्वर्या शर्मा यांच्याकडे विचारपूस करून कारवाईला सुरुवात केली. माजी महापौर शमा मुल्ला, पती सलिम मुल्ला याच्यासह पंधराजणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. सलिम मुल्ला सापडला असला तरी पिस्तूल अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही.यादवनगर-पांजरपोळ परिसरात माजी महापौर शमा मुल्ला हिचा पती सलिम मुल्ला याचा मटका जोरात सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना खबऱ्याकडून समजली होती. त्यांनी राजारामपुरीचे निरीक्षक सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते मुंबईला न्यायालयीन कामकाजासाठी गेले होते. त्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांना छापा टाकण्याचे आदेश त्यांनी दिले. शर्मा आपल्या बाराजणांच्या टीमला घेऊन सोमवारी सायंकाळी साडेसाठच्या सुमारास यादवनगर येथे आल्या. सलिम मुल्लाच्या इंडियन ग्रुप नावाच्या कार्यालयात आणि त्याच्या पाठीमागील दुमजली घरात मटका-जुगार सुरू होता. सुमारे चाळीस लोक जुगार खेळत होते. पोलिसांचा छापा पडताच सगळेजण भयभीत झाले. या सर्वांना एका रुममध्ये बसविण्यात आले. कार्यालयाशेजारीच मुल्लाचे दुमजली घर आहे. घर झडती घेण्यासाठी शर्मा गेल्या असता माजी उपमहापौर शमा मुल्ला व सलिम मुल्ला यांनी भागातील कार्यकर्त्यांना फोन करून बोलवून घेतले. चारशे लोकांचा जमाव मुल्ला यांच्या घरासमोर येताच मुल्ला दाम्पत्याने थेट शर्मा यांच्यावर हल्ला चढविला. जमावाने पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या हातात काठी होती, त्यामुळे जमावापुढे त्यांचे काहीच चालले नाही. शर्मा यांचा बॉडीगार्ड निरंजन पाटील यांच्याजवळ पिस्तूल होते. हे सलिम मुल्ला याच्या लक्षात येताच त्याने व जमावाने पाटील यांना घेरुन मारहाण करीत अंगावरील कपडे फाडून त्यांचे पिस्तूल काढून घेतले. पिस्तूल पोलिसांच्या दिशेने रोखून मुल्ला दाम्पत्यासह कार्यकर्त्यांनी तेथून पळ काढला होता.हल्ल्याची माहिती ऐश्वर्या शर्मा यांनी नियंत्रण कक्षासह पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांना दिली. त्यानंतर काही क्षणातच पोलिसांचा सशस्त्र फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दोनशेपेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा पाहून परिसरातील घरांचे दरवाजे बंद झाले. नागरिकांनी भीतीने स्वत:लाच आतमध्ये कोंडून घेतले. मुल्ला याच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. ते पाहून माजी उपमहापौर शमा मुल्लासह पंधराजणांना ताब्यात घेतले. मुल्ला हिच्या नावाची पाटी, प्रापंचिक साहित्याची जमावानेच तोडफोड केली आहे.घराचा दरवाजा तोडून झडतीमुल्ला याच्या घराचे दरवाजे तोडून पोलिसांनी झडती घेतली. मटक्याची लाखो रुपयांची रोकड, खासगी सावकारीच्या फाईली, मटक्याचे साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे, बँक पासबुके मिळून आली. सहा पासबुकांवर प्रत्येक खात्यावर पाच लाखांच्या वरती रक्कम शिल्लक असल्याच्या नोंदी मिळून आल्या. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.मुझे परची नही कॅश चाहिएयादवनगर येथील सलिम मुल्लाच्या कार्यालयाच्या मागे बोळात घराला कुलूप होते. ते शर्मा यांच्या पथकाने तोडले असता आतमध्ये काहीजण मटक्याचा हिशेब करीत असल्याचे दिसून आले. शर्मा यांनी खाक्या दाखविताच त्यांनी मटक्याच्या चिठ्ठ्या त्यांच्यासमोर टाकल्या. यावर शर्मा यांनी ‘मुझे परची नही कॅश चाहिए’ असे बोलताच त्यातील एकाने कॅश सामने है, असे सांगताच पथकाने सलिमच्या घराकडे धाव घेतली.‘मोक्का’चा प्रस्ताव प्रलंबितचसलिम मुल्ला याच्यावर डझनपेक्षा जास्त मटका, सावकारीचे राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याचा राजारामपुरी परिसरात क्लब आहे. मटका-जुगारामध्ये त्याची रोजची लाखो रुपयांची उलाढाल असते. त्याच्यावर मोक्का कारवाई करण्यासाठी पोलिसांनी प्रस्ताव तयार केला आहे. तो रद्द करण्यासाठी मुल्ला दाम्पत्याने राजकीय फिल्डिंग लावत तो प्रलंबित ठेवला आहे.