चौकट - रेस्क्यू फोर्सचे १५० जवान तैनात स्वाभिमानीच्या जलसमाधी मोर्चात कार्यकर्ते नदीत उडी घेतल्यास त्यांना वाचविण्यासाठी तालुका प्रशासनाने पंचगंगा व कृष्णा नदीपात्रात सहा यांत्रिक बोटीसह रेस्क्यू फोर्सच्या जवानांना तैनात केले होते. यामध्ये वजीर रेस्क्यू, पास रेस्क्यू व आधार रेस्क्यू फोर्सचे सुमारे दीडशे जवान नदीपात्रात तैनात होते.
गावागावातून जेवणाची सोय
मोर्चाचे हेरवाड (ता. शिरोळ) येथे दुपारच्या जेवणाचे ग्रामस्थ व स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी नियोजन केले होते. सुमारे तीन हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. त्यासाठी गावागावातून लोकांनी भाकरी, भाजी, भात आणला होता.
चौकट -
कुरुंदवाड-नृसिंहवाडी पुलावर कडक बंदोबस्त
आंदोलक जलसमाधीसाठी पुलावरून उडी मारू नये यासाठी पोलीस प्रशासनाने पंचगंगा नदीवरील दिनकरराव यादव पुलावर दोन्ही बाजूस पावला पावलावर पोलीस तैनात केले होते. शिवाय पोलिसांनी रस्सी धरून एकही आंदोलक पुलाच्या कठड्याकडे येणार नाही याची दक्षता घेतली होती. पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे एका शेतकऱ्याने लघुशंकेचा बहाणा करून पोलिसांना चकवा देत थेट नदीत उडी मारली. पोलिसांनी त्या कार्यकर्त्याचा पाठलाग केला. मात्र, त्याला अडविण्यात यश आले नाही. त्यामुळे या घटनेची आंदोलन ठिकाणी चांगलीच चर्चा रंगली होती.
दोघा कार्यकर्त्यांची पंचगंगा नदीत उडी
मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही धनंजय टारे (रा. आळते, ता. शिरोळ) व बाहुबली सारपे (रा. सरकुला, ता. पंढरपूर) अशा दोन शेतकऱ्यांनी कुरुंदवाड-नृसिंहवाडी रस्त्यावरील पंचगंगा नदीवरील दिनकरराव यादव पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी नदीपात्रात प्रशासनाने तैनात केलेल्या यांत्रिक बोटीवरील रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी त्यांना वाचविण्यात आले. मात्र, या घटनेने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शिवाय पोलिसांवर मोठा ताण आला होता.
चौकट - राजू शेट्टींकडून नाराजी व्यक्त
मोर्चा नृसिंहवाडीत पोहोचण्यापूर्वी दोन शेतकऱ्यांनी पंचगंगा नदीत उडी घेतल्याचे समजताच राजू शेट्टी यांनी अतिउत्साही कार्यकर्त्यांवर भर सभेतच नाराजी व्यक्त केली. स्वाभिमानीच्या आंदोलनाला शिस्त आहे. कोणताही कार्यकर्ता मनाला येईल तसे वागून चालत नाही. कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालून मी आंदोलन करत नाही. जलसमाधीची घोषणा मी केली आहे. शासन सकारात्मक निर्णयापर्यंत आले आहे. त्याच्या प्रस्तावाचा सर्वानी निर्णय घेऊन जलसमाधी घ्यावयाचे असेल तर प्रथम मी घेईन. मात्र, येथून पुढे संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याने आगाऊपणा करावयाचे नाही, असे शेट्टी यांनी खडसावले.