कोल्हापूर : अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या अंबाबाई मंदिराच्या परिसरात सकाळी नऊच्या सुमारास दोन बेवारस बॅगा सापडल्याने खळबळ उडाली. जुना राजवाडा पोलिसांसह बॉम्बशोध पथकाने अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेत आॅपरेशनला सुरुवात केली. वीस मिनिटांनी ‘त्या’ बेवारस बॅगेतून एका जवानाचे कपडे व कागदपत्रे मिळून आली आणि श्वास रोखून बसलेल्या पोलिसांसह भाविकांनी अखेर सुटकेचा नि:श्वास टाकला. महंमद अशरफ अब्दुलरहिम लोण (वय ३२, रा. बडवनदावर, ता. गुरज, जि. बांदीपूर, जम्मू-काश्मीर) असे त्या जवानाचे नाव आहे. टेंबलाई हिल येथील टी. ए. बटालियन येथील क्षमता कोर्ससाठी ते कोल्हापुरात आले आहेत. मोबाईलचे सीमकार्ड घेण्यासाठी ते मंदिर परिसरात बॅगा ठेवून महाद्वार रोडवर गेले होते, असे त्यांनी पोलिसांच्या चौकशीत सांगितले. अंबाबाई मंदिर हे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. त्यामुळे हा परिसर अतिसंवेदनशील म्हणून पाहिला जातो. रविवार असल्याने मंदिराच्या परिसरात पर्यटक व भाविकांची गर्दी होती. सकाळी नऊच्या सुमारास मंदिराच्या लॉकर सुविधा असलेल्या ठिकाणी दोन तासांहून अधिक काळ दोन बेवारस बॅगा मिळून आल्या. मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी या प्रकाराची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांना दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता बॅगा संशयितरीत्या ठेवल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ बॉम्बशोध पथकास संदेश दिला. त्यानंतर मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एक अनोळखी व्यक्ती बॅगा ठेवून गेल्याचे दिसून आले. त्यानंतर काही मिनिटांत पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरुवातीस लांबून पाहिले, तर तांबड्या रंगाची प्रवासी बॅग व निळ्या-पांढऱ्या रंगाची सॅक असल्याचे दिसले. दरम्यान, आॅपरेशन संपल्यानंतर बॅगा ठेवून गेलेले जवान लॉकर सुविधेच्या ठिकाणी आले. यावेळी मंदिर सुरक्षारक्षकांनी त्यांना जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी २००४ पासून आपण सैन्यदलात नोकरी करीत आहोत. आपली कोल्हापुरातील टीए बटालियन १०९ मध्ये पंधरा दिवसांच्या क्षमता कोर्ससाठी नियुक्ती झाली आहे. त्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी श्रीनगर येथून ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’ या रेल्वेने रविवारी सकाळी सहा वाजता कोल्हापुरात आलो. मोबाईलमध्ये जम्मू-काश्मीरचे सीमकार्ड असल्याने स्थानिक कार्ड घेण्यासाठी रिक्षाने अंबाबाई मंदिराच्या परिसरात आलो. येथील लॉकर सुविधेच्या ठिकाणी बॅगा ठेवून महाद्वार रोडवर सीमकार्ड खरेदी करण्यासाठी गेलो. कोणी सीमकार्ड दिले नसल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांचा लेखी जबाब घेऊन टीए बटालियनच्या कोर्ससाठी त्यांची नियुक्ती झाली आहे का, याची खात्री करण्यासाठी त्यांच्यासोबत पोलीस नाईक गजानन परीट व अमर पाटील या दोघांना पाठविले. त्यांनी खात्री केली असता ते सैन्यदलात असून त्यांची क्षमता कोर्ससाठी नियुक्ती झाल्याचे सांगण्यात आले. बॅगेत कपडे मिळताच सुटकेचा श्वास... सुरुवातीला मोव्हेटी यंत्राच्या साहाय्याने पाहणी केली असता, त्याद्वारे कोणताही इशारा मिळाला नाही. त्यानंतर खबरदारी म्हणून मोकळ्या पटांगणावर त्या दोन बॅगा प्लॅनोप्लेटर यंत्राद्वारे आणल्या. या ठिकाणी आकड्याच्या साहाय्याने त्या उघडल्या असता, त्यामध्ये पॅँट, शर्ट, टॉवेल, जॅकेट, पादत्राणे, टोपी, दाढीचे साहित्य व कागदपत्रे आढळून आली. त्यावरून ह्या बॅगा लष्कराच्या जवानाच्या असल्याचे निष्पन्न झाले. बॅगा निकामी होईपर्यंत प्रत्येकाने श्वास रोखून धरला होता. बॅगेत कपडे मिळताच सर्वांनी मोकळा श्वास घेतला. त्या बॅगांचा पंचनामा करून जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या. हा प्रकार पाहून अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेले भाविक बिथरून गेले. भाविकांनी पोलिसांचे हे आॅपरेशन पाहण्यासाठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
बेवारस बॅगांंमुळे पोलिसांची तारांबळ
By admin | Published: February 22, 2016 12:45 AM