तासगाव : वायफळे (ता. तासगाव) येथील सैनिकी मळा येथे वळणावर सांगली पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. या घटनेत चार पोलिसांसह एक आरोपी जखमी झाला. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडली. तासगाव पोलिसांत याची नोंद झाली आहे. या घटनेत आरोपी रामा दगडू बोडरे याचा हात मोडला, तर एस. पी. जगताप (तासगाव), एस. आर. सावंत (सांगली), पी. ए. कामत (सांगली) व पी. एस. काटकर (आष्टा) हे चार पोलीस किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी सांगितले की, बोडरे याने काही दिवसांपूर्वी आटपाडी येथून दुचाकीची चोरी केली होती. याप्रकरणी त्याला आटपाडी पोलिसांनी अटक केली होती व त्याची कळंबा तुरुंगात रवानगी केली होती. बुधवारी सांगली पोलिसांनी त्याला आटपाडी येथे न्यायालयात पोलीस मुख्यालयाच्या गाडीतून नेले होते. आटपाडी येथील न्यायालयातून त्याला परत सांगलीला नेण्यात येत होते. यावेळी सावंत गाडी चालवत होते. गाडी वायफळे येथे सैनिकी वळणावर आली असताना, समोरील मोटारीला चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाने जोरात ब्रेक मारला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली. यात गाडीतील आरोपी बोडरे याचा हात मोडला, तर चार पोलीस किरकोळ जखमी झाले. त्यांना वायफळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तासगावचे पोलीस उपनिरीक्षक एम. एच. शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तासगाव पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे. (वार्ताहर)
पोलीस गाडी उलटून आरोपीचा हात मोडला
By admin | Published: December 03, 2015 12:43 AM