चंदगड : लाचखोरीचे ग्रहण तालुक्याला लागले असून गेल्या पंधरा दिवसातील दुसऱ्या कारवाईत गुन्ह्यात अटकेची कारवाई टाळण्यासाठी व वाढीव कलम न लावता तपासात मदत करण्यासाठी ५ हजारांची लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने शुकवारी लाचलुचपत प्रतिबंधकाने एका पोलिस हवालदाराला ताब्यात घेतले.
राजीव शामराव जाधव (वय ४४, रा. गडहिंग्लज ) याला ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती अशी की, एका प्रकरणात फिर्यादीविरुध्द चंदगड पोलिसात गुन्हा दाखल आहे. त्याला चंदगड पोलिस ठाण्यात बोलावून नोटीस देताना गुन्ह्यात अटकेची कारवाई नको असेल तर व वाढीव कलम न लावता तपासात मदत हवी असल्यास ५ हजार द्या अशी मागणी जाधवने फिर्यादीकडे केली. याबाबतची तक्रार फिर्यादीच्या तक्रारीवरून शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष लाच रकमेची पडताळणी केली असता पदाचा दुरुपयोग करून तडजोडीअंती ४५०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जाधव विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उप अधीक्षक सरदार नाळे, पोसई संदीप बंबरगेकर, पोना संदीप काशिद, रुपेश माने, उदय पाटील, सूरज अपराध यांनी केली.
दहा दिवसांतील दुसरी कारवाई
गेल्या काही दिवसांपूर्वी पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता सुभद्रा कांबळे यांना २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. आणि दहाच दिवसात पुन्हा लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस हवालदारावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.