गारगोटी बाजारपेठेत प्रसाद पुरुषोत्तम वर्णे (रा. गारगोटी) यांचे महाराष्ट्र क्लॉथ साडी सेंटर नावाचे कापडाचे दुकान आहे. शुक्रवारी (दि. २१) मे रोजी रात्री दोनच्या सुमारास या दुकानाला आग लागली. त्यावेळी लोकांच्या मदतीने तातडीने आग विझविण्यात आली; परंतु लाखो रुपयांच्या कापडाचे नुकसान झाले होते. दुकान बंद केल्यानंतर प्रसाद वर्णे हे दुकानातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित करून इन्व्हर्टर सुरू ठेवतात. त्यामुळे शॉर्टसर्किटने आग लागण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही, असे ते उपस्थित लोकांना सांगत होते. पण लोकांनी त्यांची समजूत घातली की, ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी.
त्यानंतर वर्णे यांनी चार दिवसांत पुन्हा रंगरंगोटी, लाईटचे फिटिंग करून पुन्हा माल भरला. शनिवार (दि २९)मे रोजी रात्री पावणेतीनच्या सुमारास ओमकार केसरकर यांनी वर्णे यांना फोन करून दुकानाला आग लागली असल्याचे सांगितले. प्रसाद वर्णे हे दुकानाजवळ येऊन पाहिले तर शटरच्या खालून धूर आणि आग दिसत होती. दारात डिझेल सांडल्याचे दिसत होते. या आगीत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यावेळी हे कृत्य कोणीतरी अज्ञात माणसाने केल्याची तक्रार भुदरगड पोलिसांत दिली.
आठ दिवसांच्या आत दोन वेळा दुकान पेटविण्याचा प्रयत्न झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गारगोटी शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचे आदेश दिले. या सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्थानिक बातमीदारांकडून गोपनीय माहिती मिळविली असता, ज्वेलरी इमिटेशनचा व्यवसाय करणाऱ्या अमित विजय कव्हेकर याने दुकान पेटविल्याची कबुली दिली.
फोटो : संशयित आरोपी अमित कव्हेकर.