कोल्हापूर : येथील शाहूपुरी-स्टेशन रोड परिसरातील राधाकृष्ण हॉटेलसमोर मोपेडवरील चालकाला ठोसा लगावून हवालाचे तीस लाख रुपये लूटमार प्रकरणातील मुख्य सूत्रधारास शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी अटक केली. संशयित आरोपी कुलदीप अरुण पोवार (वय २८, रा. पूलगल्ली, रविवार पेठ) असे त्याचे नाव आहे. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. महिलेसह सात आरोपींकडे कसून चौकशी सुरू आहे. सांगलीतील एम. माधव कंपनीचे कर्मचारी अरुणभाई सुतार व नीकेश पटेल हे ‘हवाला’चे तीस लाख रुपये घेऊन जाताना दि. २३ च्या रात्री त्यांना मारहाण करून रोकड लंपास केली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी लूटमारीचा छडा लावून संशयित आरोपी सुजाता कमलेश पटेल, विशाल जयसिंग मछले, लखन चंद्रकांत देवकुळे, देवेंद्र ऊर्फ ढेब्या रमेश वाघमारे, शुभम कृष्णात पाटील, केतन सुरेश खोत यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली व २३ लाख रुपये रोकड असा सुमारे २४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. केतन खोत याच्या चौकशीमध्ये कुलदीप पोवार हा निष्पन्न झाला. ३० लाखांपैकी २३ लाख पोलिसांनी जप्त केले आहेत. उर्वरित सात लाख आरोपींकडून हस्तगत करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी दिली. (प्रतिनिधी)
‘हवाला’ लुटीतील मुख्य सूत्रधारास पोलिस कोठडी
By admin | Published: August 01, 2016 12:45 AM