कोल्हापूर : लाचखोरीमुळे कोल्हापूर पोलीस दलाची मोठी बदनामी होत आहे. गेल्या काही दिवसापुर्वीच दहा लाखांच्या लाच प्रकरणी दोघा पोलिसांना जेरबंद करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच आज, शुक्रवारी आणखी एक पोलीस पोलीस कॉन्स्टेबल लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला. शहापूर (तालुका हातकणंगले) येथील पोलीस कॉन्स्टेबलला दीड हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने अटक केली आहे. याकारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. जगदीश संकपाळ रा. यड्राव. ता. शिरोळ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर लाचेची मागणी करणारा पोलीस हवालदार आसिफ शिराजभाई हा पसार झाला.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आत्याचे नावे न्यायालयाकडून वॉरंट निघाले होते. याप्रकरणी अटकेची कारवाई टाळण्याकरिता शहापूर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. असिफ नसिरुद्दीन सिराजभाई आणि जगदीश भूपाल संकपाळ या दोघांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यातक्रारीनुसार या दोघांवर सापळा रचण्यात आला. दरम्यान यात तडजोडीअंती दीड हजार रुपये स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पोलीस पाटील जगदीश संकपाळ याला रंगेहाथ पकडले. तर फरारी पोलीस हवालदार आसिफ शिराजभाई याचा पोलीस शोध घेत आहेत.