कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीशेजारी बेवारस कापडी बॅग सापडल्याने खळबळ उडाली. शाहूपुरी पोलिसांसह बॉम्बशोध पथकाने अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेत आॅपरेशनला सुरुवात केली. काही सेकंदात ‘त्या’ बेवारस बॅगेतून मळकट कपडे, रग आणि बांधकामासाठी वापरला जाणारा मोजमापाचा टेप मिळून आला. यावेळी परिसरात श्वास रोखून बसलेल्या प्रवासी व रिक्षाचालकांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांचा थरार पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती.
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात नेहमी पर्यटक, भाविक, प्रवासी, नागरिक व विद्यार्थ्यांची वर्दळ असते. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वाहतूक शाखेची पोलीस चौकी व रिक्षास्टॉपला लागून एक बेवारस कापडी बॅग असल्याची माहिती मिळताच पोलीस मुख्यालयातून बॉम्बशोध पथकासह शाहूपुरी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अचानक पोलीस दाखल झाल्याने प्रवासी, नागरिक भयभीत झाले. काय झाले कोणालाच माहीत नसल्याने सर्वजण उलट-सुलट चर्चा करू लागले.
प्रत्येकजण एकमेकाला ‘काय झाले, पोलीस का आलेत?’ अशी विचारणा करीत होता. बॉम्बशोध पथक आणि डॉग स्क्वाडने बेवारस बॅगेचा अंदाज घेतला. त्यानंतर पथकातील तज्ज्ञांनी मोव्हेटी यंत्राच्या साहाय्याने बॅगेची पाहणी केली असता, त्याद्वारे कोणताही इशारा मिळाला नाही. बॅग उघडली असता, त्यामध्ये मळकट कपडे, अंगावर घेण्याचे पांघरूण, बांधकामासाठी मोजमापाचा टेप असे साहित्य आढळून आले.
बॅग निकामी होईपर्यंत प्रत्येकाने श्वास रोखून धरला होता. बॅगेत कपडे मिळताच सर्वांनी मोकळा श्वास सोडला. त्या बॅगेचा पंचनामा करून शाहूपुरी पोलिसांनी ती ताब्यात घेतली. ही बॅग कोणाची, ती कोणी ठेवली यासंबंधी आजूबाजूला विचारपूस सुरू होती. ती एखाद्या फिरस्त्याची किंवा गवंडीकाम करणाऱ्या कामगाराची असण्याची शक्यता असल्याचे बॉम्बशोध पथकाचे प्रमुख विकास टेके यांनी सांगितले.