कोल्हापूर : यादवनगर-पांजरपोळ येथील मटकाअड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करून सर्व्हिस पिस्तूल जबरदस्तीने काढून घेत रोखल्याने माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २४ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मटकाचालक सलीम यासिन मुल्ला पिस्तूल घेऊन आपल्या साथीदारांसह पसार झाला आहे.पोलीस पथकावरील हल्ल्याची अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. संशयितांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, शासकीय कामात अडथळा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, एकत्र जमाव करून हाणामारी करणे, अवैध व्यवसाय चालविणे, अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये ५० जणांचा समावेश आहे. त्यापैकी २४ जणांना पोलिसांनी अटक केली. हल्ल्यामध्ये महिलांचाही समावेश असल्याने त्यांनाही ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरूआहेत. पोलिसांनी १८ पानी पंचनामा तयार केला आहे. जास्तीत जास्त पुरावे गोळा केले आहेत. काही साक्षीदारांचे जबाबही पोलिसांनी घेतले आहेत. त्यामध्ये मुल्ला याच्या घरासमोरील रहिवाशी आणि पथकातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक शर्मा यांचाही जबाब घेतला आहे.हल्ल्यामध्ये शर्मा यांचा बॉडीगार्ड निरंजन पाटील हा जखमी झाला आहे. त्याच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार करण्यात आले. त्याची विचारपूस पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी केली. सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत. मंगळवारी दिवसभर संशयितांची धरपकड सुरूहोती.सलीम राजकीय नेत्याच्या आश्रयाला ...मुख्य संशयित सलीम मुल्ला हा भाऊ जावेद, फिरोज, कार्यकर्ते मंगेश सुतार, सुंदभ दाभाडे, नीलेश काळे, सुहेल जमादार, समीर, मंदार, भोल्या, पप्या, नियाज मुजावर यांच्यासह पसार झाला आहे. तो कोल्हापुरातून बाहेर जाऊ नये, यासाठी शहराच्या सर्व नाक्यावर प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. तो एका राजकीय नेत्याच्या आश्रयाला गेल्याची चर्चा आहे. वातावरण निवाळल्यानंतर स्वत:हून त्याला हजर करण्याच्या हालचाली काही नेत्यांच्या सुरूआहेत.ठाण्याबाहेर महिलांचा आक्रोशमाजी उपमहापौर शमा मुल्ला हिच्यासह २४ जणांना पोलिसांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्रीपासून ठेवले होते. मंगळवारी त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्याची तयारी पोलीस करत असताना यादवनगर-पांजरपोळ येथील महिलांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केल्याने वातावरण तणावपूर्ण होते. खबरदारी म्हणून सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आपल्या मुलाला, पतीला गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याचे समजताच महिलांनी पोलीस ठाण्याबाहेर हंबरडा फोडला होता. ‘काय झालं’, ‘कुणासाठी भोगतोय’, ‘सांगत होतो जाऊ नको’, ‘आता कोण येणार सोडवायला’, असा आरडाओरडा महिला करत होत्या.३ लाख किमतीचे पिस्तूलप्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांना विदेशी बनावटीचे सर्व्हिस पिस्तूल दिले आहे. ते त्यांचा बॉडीगार्ड निरंजन पाटील याच्याकडे असायचे. या पिस्तुलाची किंमत तीन लाख रुपये आहे. संशयित सलीम मुल्ला हे पिस्तूल घेऊन पसार झाला आहे. त्यामध्ये दहा जिवंत काडतुसे आहेत. ते लॉक आहे. सरकारी पिस्तूल असल्याने त्याचे लॉक सहजासहजी बाहेरच्या लोकांना काढता येत नाही. हे पिस्तूल हस्तगत करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.अडीच लाखांची रोकड जप्तमुल्ला याच्या घरातून पोलिसांनी मटक्यातून मिळालेली अडीच लाखांची रोकड जप्त केली आहे. महत्त्वाच्या जमीन खरेदी-विक्रीच्या सावकारकीच्या फायलीही जप्त केल्या आहेत.अटक झालेल्यांची नावे अशी :माजी उपमहापौर शमा सलीम मुल्ला (वय ४२), तौफिक सद्दाक शिकलगार (३८, रा. सदर बझार), फिरोज खलील मुजावर (५७), शाहरुख रफिक लाड (२४), जावेद शौकत नाचरे (२१), अजय बाळासाहेब कांबळे (वय ४७), शाहरुख रफिक लाड (२४) , उमेर मुजाहिद मोमीन (२०) साहिल नियाज मुजावर (२०), ओंकार रवींद्र पारीसवाडकर (३३), आकाश लक्ष्मण पोवार (१८),रोहित बाळू गायकवाड (४५), टिपू मुल्ला (३०), सुनील दाभाडे (३५), सज्जाद ईसाक नाईकवडी (५२, सर्व, रा. यादवनगर), दिलीप वामन कवडे (४०, रा. सदर बझार), विजय मारूती सांगावकर (४३, रा. शाहूनगर), अरिफ रफिक शेख (२४, रा. बीडी कामगार वसाहत), जमीर साहेबजी मुल्ला (२८, रा. राजारामपुरी, माउली पुतळा), श्रीधर शिवाजी कांबळे (२३), साहिल आमिन नदाफ (२४), मुश्रीफ पठाण (२१), इमाम आदम शेख (४०, सर्व रा. शास्त्रीनगर), रोहित बाळू गायकवाड (४५)
शमा मुल्लांसह २४ जणांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:37 AM