कोल्हापूर : मालवाहतुकीच्या वाहनांमध्ये चालकासह अतिरिक्त चालक व वाहक अशी सवलत प्रशासनाने दिली आहे. मात्र, या सवलतीचा गैरवापर केल्याप्रकरणी सहा, तर कोरोना रुग्णाला घेऊन प्रवास केल्याबद्दल चौघे असे दहाजणांवर रविवारी पोलिसांनी गुन्हे दाखल केले.गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात १३ हजार २१८ मालवाहतुकीच्या वाहनांना प्रवेश दिला आहे. त्यापैकी ६ हजार ४६९ वाहने कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेबाहेर गेली आहेत. तर ६ हजार ७४९ इतकी वाहने जिल्ह्यात आली आहेत.
तपासणी नाक्यांवर तपासणीही कसून केली जात आहे. मात्र, सवलतीचा गैरवापर करून आदेशांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी महंमद शफीक अहमद (वय ५०, रा. शरदनगर आर. सी. मार्ग, माहुल रोड, वाशी नाका, चेंबूर), इब्रार अहमद आशिक (४०, भदईपूर, प्रतापगड), महंमद करीम मुनवर शरीफ अहमद (३७) यांनी आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक डी. डी. ०३, के. ए. ९४३५ हा एकत्रित बसून चालवित संचार करून संसर्ग वाढविण्याचा प्रयत्न केला. तर संपत पांडुरंग पाटील (४०, रा. तळसंदे (ता. हातकणंगले), संदीप भीमराव सूर्यवंशी (४२, रा. सूर्यगाव, पलूस, जि. सांगली), अनिल आत्माराम पाटील (४०, रा. तळसंदे (ता. हातकणंगले) यांनीही शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करीत अवैध प्रवासी वाहतूक वाहनांमध्ये प्रवास केला. अशा सहाजणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.या चौघांवरही गुन्हे दाखल
शाहूवाडी पोलिसांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घेऊन प्रवास केल्याप्रकरणी मल्लेश सौउतबंडा (वय ४५, रा. सन आॅफ सुकबंड मरिअप्पा), संजीवा अंजनीया यादव (वय २५), हनुमंत रंगाप्पा यादव (४६), चालक रमेश एम. पूर्ण नाव माहीत नाही, यांच्यावर, तर वडगाव पोलिसांनी सय्यद मुक्तार साबीर (२८, रा. अक्कायम्मा ले आऊटजवळ, कुल्लाप्पा, सर्कल, बंगलोर) यांच्यावरही गुन्हा दाखल केला.